पाणी खेचण्यासाठी वीज मोटारींचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:03 AM2019-05-21T00:03:03+5:302019-05-21T00:07:03+5:30
पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
पंचवटी : पंचवटीतील हिरावाडी परिसर, शिवकृपानगर, कमलनगर, अयोध्यानगरी, कळस्करनगर, भगवतीनगर या परिसरात पाणी भरण्यासाठी सर्रासपणे वीज मोटारींचा वापर केला जात असला तरी महापालिका प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने कारवाई करणार कोण असा सवाल संतप्त नागरिकांनी केला आहे.
महापालिकेकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा कमी दाबाने व अपुरा होत असल्यामुळे पुरेसे व वेगाने पाणी भरता यावे यासाठी अनेक बंगलेधारक तसेच रो-हाउसमध्ये राहणारे नागरिक सर्रासपणे नियमांची पायमल्ली करत वीज मोटारींचा वापर करतात. मोठ्या प्रमाणात पाणी खेचले जात असल्यामुळे अन्य नागरिकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. पाणी भरण्यासाठी नागरिकांनी वीज मोटारींचा वापर टाळावा, असे आवाहन करून वीज मोटारींचा वापर करणाऱ्यांवर मनपा प्रशासनाकडून कारवाई केली जाईल, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र संबंधित विभागाकडून पंचवटीत अद्याप पावेतो कारवाई शून्य असल्याने मनपाच्या आदेशाला नागरिकांनी केराची टोपली दाखविली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उन्हाळा सुरू असल्याने शहरात काही भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे प्रशासनाकडून सुचविले जाते; मात्र वीज मोटारीच्या सहाय्याने वेगाने पाणी खेचून भरण्याच्या प्रयत्नात अनेक ठिकाणी पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र दिसून येते.
सार्वजनिक स्टँड पोस्टवर अपव्यय
महापालिका प्रशासनाच्या वतीने गावठाण परिसरात राहणाºया नागरिकांसाठी सार्वजनिक स्टँड पोस्ट उभारलेले आहे. पंचवटी परिसरातील सार्वजनिक स्टँड पोस्टवर सकाळ व सायंकाळच्या सुमाराला महिला धुणी-भांडी करत हजारो लिटर पिण्याच्या पाण्याचा अपव्यय करत असल्याचे चित्र दैनंदिन दिसून येते. बंगलेधारक सकाळ व सायंकाळच्या वेळी घराबाहेर रस्त्यावर पाण्याचा सडा मारून पाण्याचा अपव्यय करत असल्याने त्यांच्यावरदेखील दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़