गोदावरी स्वच्छतेसाठी तरंगत्या सायकलचा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 02:03 AM2018-03-02T02:03:40+5:302018-03-02T02:03:40+5:30
नाशिक : सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्ट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणाºया सायकलचा प्रयोग यशस्वी केला आहे.
नाशिक : सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्ट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकणबंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणाºया सायकलचा प्रयोग यशस्वी केला आहे. या प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गोदावरी स्वच्छतेचा संकल्प केला असून, याचे पहिले प्रात्यक्षिकही विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले. इस्पॅलियर शाळेतील सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेला संशोधनाची जोड देत तयार केलेल्या या तरंगत्या सायकलचा उपयोग गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी होणार आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ही तरंगती सायकल तयार केली आहे. विद्यार्थ्यांनी सायकलचा वापर करत चाकांच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्ट्यांचे चौकटी रॅकेट बसविले असून, चौकटीमध्ये झाकणबंद पाण्याचे आठ रिकामे जार बसविले आहेत. हवेचा दाब आणि प्लॅस्टिकच्या जारमुळे सायकल पाण्यावर सहजरीत्या तरंगते व पँडलच्या माध्यमातून सायकल पाण्यावर चालवली जाते. या सायकलच्या पुढे लोखंडी पट्टी बसविण्यात आली असून, तिला प्लॅस्टिकची जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून पाण्यात असलेला कचरा, प्लॅस्टिक, पाणवेली, हिरवे गवत असे सर्व काही सहजरीत्या काढता येत असल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी गोदाघाटावर करून ते यशस्वी केले.