आंदोलकांना हटविण्यासाठी बळाचा वापर
By admin | Published: January 28, 2017 01:04 AM2017-01-28T01:04:15+5:302017-01-28T01:04:28+5:30
त्र्यंबकेश्वर माजी सैनिक घर प्रकरण : २१ आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
नाशिक : १९९५ पूर्वीच्या झोपड्या तत्काळ नियमित कराव्यात, त्र्यंबकेश्वरमधील १३० झोपड्यांची जागा रहिवाशांच्या नावे करावी, माजी सैनिक मेजर रामराव लोंढे यांच्या पाडलेल्या घराची नुकसानभरपाई द्यावी, आरक्षित भूखंडांवरील नगरसेवकांची अतिक्रमणे हटवून त्यांचे नगरसेवक पद रद्द करून दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी यांसह विविध मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला़ जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी बळाचा वापर करीत ताब्यात घेतले़ यामध्ये एक महिला पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाली़
श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबकेश्वरमधील शेकडो आदिवासी, बिगर आदिवासी समाजातील लोकांनी आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्यांसाठी प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला होता़ संघटनेने पालकमंत्री गिरीश महाजन व जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना दिलेल्या निवेदनानुसार त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या हद्दीत भारतीय सैन्य दलातील माजी सैनिक रामराव लोंढे यांनी शासनाकडून जागा विकत घेऊन १९९१ पूर्वी रितसर परवानगी घेऊन घर बांधले़; मात्र हे घर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी अतिक्रमित दाखवून पाडले़ या प्रकरणाची चौकशी करून या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी़
राज्यभरातील माजी सैनिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी बैठक घ्यावी, माजी सैनिकांच्या घरपट्ट्या माफ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, त्र्यंबकेश्वरमधील अतिक्रमणाला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कायदेशीर कारवाई करावी या मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास संघटनेतर्फे जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष विवेक पंडित, उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, केशव नानकर, बाळाराम भोईर, विजय जाधव यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)