इकोसेन्सेटिव्ह झोनमध्ये जिलेटिनचा वापर गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2021 04:20 AM2021-08-25T04:20:15+5:302021-08-25T04:20:15+5:30
नाशिक: इकोसेन्सेटिव्ह झोन असतानाही विकासकाने उत्खननासाठी जिलेटिनचा वापर करणे गंभीर असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अन्यथा ...
नाशिक: इकोसेन्सेटिव्ह झोन असतानाही विकासकाने उत्खननासाठी जिलेटिनचा वापर करणे गंभीर असून त्यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अन्यथा संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिला आहे.
मंगळवारी मंत्रालयात ब्रम्हगिरी पर्वतरांगेतील संतोषा, भागडी डोंगरावरील अवैध उत्खनन प्रकरणी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी ब्रम्हगिरी बचाव कृती समिती, गौण खनिज अधिकारी, सुपलीची मेट येथील ग्रामस्थ तसेच पर्यावरणप्रेमींची बैठक घेतली. यावेळी त्यांनी पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आपले सहकार्य असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी येथील अवैध उत्खननाबाबत कृती समितीतील सदस्यांचे म्हणणे ऐकून घेतले. सुपलीची मेट येथील ग्रामस्थांच्या भावनाही जाणून घेतल्या.
ब्रम्हगिरी बचावासाठी सुरू झालेल्या मोहिमेत विकासकांनी नियम धाब्यावर बसवून अत्यंत खोलवर केलेल्या उत्खननाची संपूर्ण माहिती, छायाचित्रे मंत्री बनसोडे यांना कृती समिती सदस्यांनी दाखविले. यावेळी झालेल्या चर्चेत ब्रह्मगिरी येथील गट नंबर १०४ व १२३ या दोन गटावर चर्चा झाली. यामध्ये गट क्रमांक १२३ हा महसूल असतानाही या ठिकाणी वृक्षतोड व उभ्या डोंगरांचे उत्खनन झाल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. ब्रह्मगिरी उत्खनन प्रकरणात विकासकाने जिलेटिन कांड्या वापरल्याची गंभीर दखल बनसोडे यांनी घेतली. जिलेटिन कांड्या वापरण्याची तसेच साठा करण्याची परवानगी विकासकाने घेतली होती का, असा सवाल मंत्र्यांनी उपस्थित केला तसेच पुढील सात दिवसात याप्रकरणी गुन्हा दाखल न केल्यास अधिकाऱ्यांचेच निलंबन केले जाईल अशा शब्दात त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
ब्रह्मगिरीचा परिसर हा दहा किलोमीटर पर्यंत इकोसेन्सेटिव्ह झोन असल्याने या भागात असे गैरप्रकार होता कामा नये असे सहसचिव पर्यावरण जॉय ठाकूर यांनी सांगितले. विकासकाने केलेल्या स्फोटांमुळे गट नंबर १२३ च्या वर असलेली सुपलीची मेट वस्ती भयभीत असून स्फोटांमुळे खासगी तसेच सार्वजनिक मालमत्तेला तडे गेलेले आहेत. याप्रकरणात एफआयआर दाखल होत नसल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर यात कोणताही राजकीय, सामाजिक दबाव खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
बैठकीस कृती समितीचे अंबरीश माेरे, मनोज साठे, वैभव देशमुख, चंद्रकांत सांगळे, बेलगाव ढगा येथील सरपंच दत्तू ढगे, सुपलीची मेट येथील रहिवासी जगन झोले उपस्थित होते. पर्यावरण विभागाचे सहसचिव जॉय ठाकूर, प्रभारी जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रशांत पाटील, वनविभागाचे झाेले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अमर दुर्गुळे आदी उपस्थित होते.
--इन्फो--
सर्वेक्षण समिती गठित
ब्रम्हगिरी येथील अवैध उत्खनन रोखण्याबरोबरच पर्यावरण रक्षणासाठी पर्यावरण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पर्यावरण कार्यकर्ते, स्थानिक अधिकारी, कृती समितीचे पदाधिकारी, खनिकर्म अधिकारी, वनविभाग यांची सर्वेक्षण समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
240821\24nsk_52_24082021_13.jpg
कॅप्शन: बैठकीस मार्गदर्शन करतांना पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोड,समवेत अंबरीश माेरे, मनोज साठे, वैभव देशमुख, चंद्रकांत सांगळे, दत्तू ढगे, जॉय ठाकूर, प्रशांत पाटील आदि