उमराणे बाजार समितीत मायक्रोफोन स्पिकरचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:11 AM2021-06-04T04:11:56+5:302021-06-04T04:11:56+5:30
उमराणे : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना कोविडविषयक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचे पालन ...
उमराणे : कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना कोविडविषयक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांचे पालन होत असतानाच येथील स्व.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीने एक पाऊल पुढे टाकत बाजारभाव ऐकणाऱ्यांची गर्दी कमी करण्यासाठी पुकारा करणाऱ्या कर्मचाऱ्याजवळ मायक्रो फोन स्पिकर देण्यात आला आहे. या स्पिकरमुळे संपूर्ण बाजार समितीच्या आवारात प्रत्येक वाहनधारक व कांदा विक्रेत्या शेतकऱ्यास आपल्या वाहनाजवळ बसून बाजारभाव ऐकता येत असल्याने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात बाजार समितीला यश आले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात एक आदर्श डिजिटल बाजार समितीकडे येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीची वाटचाल सुरु आहे. बाजार समितीचा आत्मा असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समितीच्या वतीने पिण्याचे शुद्ध पाणी, बैठक व्यवस्था, मानसन्मान आदींवर भर दिला जात आहे. त्याचबरोबर बाजार समितीच्या सर्व घटकांना सूचना, नियम आदी ऐकवण्यासाठी संपूर्ण बाजार आवारात ठिकठिकाणी लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत. सद्यस्थितीत या लाऊडस्पीकरद्वारे कोरोनाविषयक नियमांची जागृती केली जात आहे. मात्र बाजार आवारात लिलाव सुरु असताना काय बाजारभाव निघतो व कोणाच्या कांद्याला काय भाव मिळतो यासाठी सुरू असलेल्या लिलावात शेतकरी गर्दी करतात. ही गर्दी टाळण्यासाठी येथील बाजार समितीने थेट शेतकऱ्यांना त्यांच्या वाहनाजवळ बसून काय बाजारभाव चालू आहे हे ऐकण्यासाठी कांदा पुकारणाऱ्या कर्मचाऱ्याला मायक्रो फोन स्पीकर (माईक) देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार आवारातील लाऊडस्पीकरद्वारे कोविड नियमांबरोबरच बाजारभाव ऐकू येत असल्याने होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात बाजार समितीला यश आले आहे.
--------------------
बाजार आवारात लिलाव सुरु होताच बाजारभाव काय निघतो यासाठी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मायक्रोफोन स्पिकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी झाले आहे.
- तुषार गायकवाड, सहायक सचिव. उमराणे बाजार समिती