दुचाकी चोरीसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:27 AM2018-10-23T01:27:58+5:302018-10-23T01:28:27+5:30
अल्पवयीन मुलांकडून शहरातील दुचाकीचोरी करून घेऊन या दुचाकींची मुंबई, ठाणे तसेच विविध शहरांमध्ये विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे़
सिडको : अल्पवयीन मुलांकडून शहरातील दुचाकीचोरी करून घेऊन या दुचाकींची मुंबई, ठाणे तसेच विविध शहरांमध्ये विक्री करणाऱ्या दोघा संशयितांना अंबड पोलिसांनी अटक केली आहे़ या संशयितांमध्ये अक्षय बन्सीलाल सूर्यवंशी (२०, रा. नाईकवाडी, कोनगाव, ता. भिवंडी, जि. ठाणे) व पंकज सूर्यवंशी (रा. शांतीनगर झोपडपट्टी, अंबड) यांच्यासह आणखी दोन अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त अशोक नखाते यांनी पत्रकार परिषदेत दिली़ नखाते यांनी सांगितले की, अंबड पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते़ या गुन्ह्यांच्या तपास करीत असताना त्यामध्ये दोन अल्पवयीन मुले व संशयित पंकज सूर्यवंशी याचा सहभाग असल्याचे समोर आले़ त्यानुसार या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर सखोल चौकशी केली असता. एका अल्पवयीन मुलाने ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील आपला मामा अक्षय सूर्यवंशी यास चोरीची एक दुचाकी विक्री केल्याचे सांगितले़ त्यानुसार अक्षय सूर्यवंशी यास ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलांना दुचाकी व वाहने चोरी करण्यास सांगून या चोरी केलेल्या वाहनांची ठाणे व मुंबईमध्ये विक्री केल्याचे समोर आले़ या चौघा संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी नऊ दुचाकी चोरल्याची कबुली दिली़ त्यांच्याकडून चोरीच्या नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत़ अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण, शांताराम शेळके, भास्कर मल्ले, संजीव जाधव, दत्तात्रय गवारे, चंद्रकांत गवळी, दुष्यंत जोपळे, अविनाश देवरे यांनी ही कामगिरी केली़