नैसर्गिक साधनांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 01:09 AM2018-09-08T01:09:05+5:302018-09-08T01:09:10+5:30
गणपती बाप्पाचा प्रवास अनंतापासून अनंतापर्यंतचा मानला जातो. आमल्या पूर्वजांनी स्वत:च्या फायद्यासाठी गणपतीच्या नावाने उत्सव सुरू केला. जो आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सर्वांनी आनंदाने एकत्र येवून आपली ताकद जास्तीत जास्त समाजहितासाठी वापरात हा यामागचा हेतु होता.
पर्यावरण स्नेही गणेशोत्सव/प्रदीप तानपाठक
गणपती बाप्पाचा प्रवास अनंतापासून अनंतापर्यंतचा मानला जातो. आमल्या पूर्वजांनी स्वत:च्या फायद्यासाठी गणपतीच्या नावाने उत्सव सुरू केला. जो आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे. सर्वांनी आनंदाने एकत्र येवून आपली ताकद जास्तीत जास्त समाजहितासाठी वापरात हा यामागचा हेतु होता.मात्र आजकाल या आनंदाचा अतिरेकी अट्टाहास होत चालला आहे. पूर्वी मुर्ती मातीपासून बनलेली असायची, ती पूर्णत: नैसर्गिक असायची. आता मुर्ती, सजावट, उत्सव साजरा करण्यातली कृत्रिमता अशा सगळ्याच गोष्टी पर्यावरणाला, समाजाला हानीकारक बनत चालल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशी ढोल, ताशे, झांज, लेझिम आणि डॉल्बी यांचा अतिप्रचंड आवाजअसतो. या सर्व गोष्टी थांबल्या पाहिजेत.पर्यावरणस्रेही गणेशोत्सव साजरा करणे सहज शक्य आहे. त्याची सजावट करण्यासाठी साहित्य आपल्या घरातुनच मिळू शकते. प्रतिष्ठापना करणारी मुर्ती शाडूची, कागदाच्या लगद्यापासून तयार केलेली वापरता येइल. हल्ली शाडूच्या गणपतीचे प्रमाण वाढत चालले आहे ही समाधानकारक बाब आहे. सजावटीसाठी थर्माकोलऐवजी पुठ्ठा, घरातल्या जुन्या पत्रिका, काथ्या, प्लाय, कार्डशीट, दोरे, सुतळ्या, पेपर, वाळवलेली फुले, पाने, शंख, शिंपले, आईस्क्रीमच्या काड्या, आरसे, मोरपिस, अन्य पक्षांची पिसे, बदाम, पिस्त्यांची साले, आर्टिफिशीयल फुले अशा असंख्य गोष्टी आपण वापरु शकतो. कल्पनाशक्तीला वाव देत सजावट केली तर आपण सुंदर देखावे साकारु शकतो. आपल्या घरातला गणपती आणि त्याची सजावट जितकी साधी, नैसर्गिक साहित्याचा वापर करुन केलेली असेल, तितके आपल्याला आणि गणपती बाप्पाला प्रसन्न वाटेल. पाना, फुलांचा, फळांचाही आपण सजावटीसाठी वापर करु शकतो. मातीचा ढिग करुन, त्यात बिया पेरुन, व त्यावर अंकुर वाढवून नैसर्गिक डोंगर तयार करु शकतो. नुसत्या वीटा जरी घेतल्या तरी तुम्ही त्यातुन अनेक प्रकारचे देखावे तयार करु शकता. थर्माकोलच्या मखराऐवजी आकाशकंदिल प्रमाणे कागदी, कापडी, ज्युट, ग्लेझ पेपर आदि साहित्यापासून निरनिराळ्या आकाराचे मखर बनवू शकता. ते तुम्ही काम झाल्यानंतर पुर्णपणे उघडून, सांभाळून ठेवू शकता. थर्माकोलवरील प्रेम आपण कमी केलेच पाहिजे.वापरात नसलेल्या सीडीज किंवा प्लास्टिकच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक कचरा याचा सृजनात्मक वापर करु शकतो.