द्राक्षबागा वाचविण्यासाठी नैसर्गिक घटकांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:47 PM2019-11-29T23:47:05+5:302019-11-30T01:03:02+5:30
परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.
वणी : परतीच्या पावसाचा फटका बसलेल्या द्राक्षांचा दर्जा टिकविण्यासाठी उत्पादकांनी नामी शक्कल लढवित शेंगदाणा, गुळासह सोयाबीनसारख्या नैसर्गिक घटकांच्या वापराचा प्रयोग सुरू झाला आहे.
द्राक्षबागांवर द्राक्षांचे बहारदार द्राक्ष नजरेत भरू लागली असून, उत्तम, दर्जेदार व चविष्ट द्राक्षे नैसर्गिक पद्धतीने उत्पादित होऊन परिसराचा नावलौकिक कायम राहावा याकरिता उत्पादक प्रयत्नशील आहेत. काही कालावधी-पूर्वी अतिवृष्टी, प्रतिकूल वातावरणामुळे तालुक्यातील सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागांना फटका बसला तर काही द्राक्षबागा भुईसपाट झाल्या. नुकसानीतून वाचलेल्या बागांना नवसंजीवनी देण्यासाठी महागड्या द्रवरूपी औषधांची फवारणी पावडर व इतर उपाययोजना उत्पादकांनी केल्या.
द्राक्षबागांच्या मुळाशी एकरी एक क्विंटल शेंगदाणा ढेप, वीस किलो सोयाबीन पीठ, दहा किलो गूळ व आवश्यक असल्यास चणा डाळीचे पीठ असे सर्व घटक सहाशे लिटर पाण्यात एकत्रित करून द्रवस्वरूपात एकजीव झाल्यानंतर द्राक्षझाडांच्या मुळांना हे मिश्रण द्यावयाचे त्यासाठी विशिष्ट पद्धतीचा गाडा तयार करून त्याद्वारे ही प्रक्रिया पार पाडण्यात येते, अशी माहिती द्राक्ष उत्पादक जयवंत थोरात यांनी दिली. यामुळे द्राक्षाचे आकारमान वाढते, त्यातील गर वाढतो, साखरेची पातळी नैसर्गिक पद्धतीने वाढते व कडकपणा टिकून राहतो तसेच द्राक्षाचा रंग व चव यातही सकारात्मक बदल दिसून येतात, अशी माहिती प्रदीप जमधडे, अण्णा चव्हाणके यांनी दिली. सद्यस्थितीत सुमारे पन्नास टक्के द्राक्षबागा सुस्थितीत असून, उत्पादनात मोठी घट येणार आहे त्यामुळे दर्जेदार व चविष्ट द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे. त्यानुसार द्राक्षाचा दर्जा टिकविण्यासाठी नमूद प्रयोग बहुतांशी उत्पादक करीत आहेत. सध्या नैसर्गिक घटकांचा वापर करून शेती उत्पादनाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले तर भवितव्यासाठी ही बाब सकारात्मक असून, उत्पादकांनी हे आव्हान स्वीकारून बदल करण्याची मानसिकता ठेवावी, असे आवाहन उत्पादक महेंद्र बोरा, प्रकाश कड, विलास कड, नामदेव घडवजे, सुनील बर्डे, माणिक गोलांडे यांनी केले आहे.