जिल्ह्यात नायलॉन मांजा वापराला बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 01:05 AM2021-12-29T01:05:17+5:302021-12-29T01:06:04+5:30
नायलॉन मांजाची विक्री करणे तसेच वापर करण्यास जिल्ह्यात बंदी असल्याने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.
नाशिक : नायलॉन मांजाची विक्री करणे तसेच वापर करण्यास जिल्ह्यात बंदी असल्याने नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे. मागीलवर्षीदेखील जिल्ह्यात प्रशासनाकडून मांजाविरोधी मोहीम राबविण्यात आली होती. शहर, जिल्हा परिसरात आताच नायलॉन मांजाचा वापर वाढल्याने या प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने देखल घेतली आहे. अनेक ठिकाणी अशाप्रकारचा बंदी असलेला मांजा विक्री होत आहे. याबाबतच्या अनेक तक्रारीदेखील प्राप्त होत असल्याने बंदी असलेला मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट संकेत जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. पक्षी तसेच माणसांसाठीदेखील नायलाॅन मांजा जीवघेणा ठरत असल्याने त्या विरोधात प्रशासन गंभीर आहे. मांजामुळे अनेकांच्या जीवावर बेतले आहे. धारदार नायलाॅन मांजाने अनेक पक्षी मृत्युमुखी पडतात. वाहनावरून जाताना नायलाॅन मांजाने गळा चिरून अनेकांना प्राणास मुकावे लागले. ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी मांढरे यांनी यंत्रणेला कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.