विवाह सोहळ्याचा खर्च सामाजिक कार्यात वापरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:39 AM2018-04-26T00:39:38+5:302018-04-26T00:39:38+5:30
लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात दिल्यास कार्यक्र मास हातभार लागेल किंवा दानशूर व्यक्तींनी या पैशाचा वापर सामाजिक कार्यात करण्यासाठी सोशल मीडिया सरसावला आहे.
आडगाव : लग्नकार्य व विविध समारंभात टॉवेल-टोपी देण्याची पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे. लग्नकार्यातही टोप्या, टॉवेल आणि शाल जमा होतात. त्यामुळे एका कार्यक्रमात हजारो रुपये वायफळ खर्च होतात. त्यामुळे टॉवेल, टोपी, शाल यांच्यासाठी खर्च होणारे पैसे मदत स्वरूपात दिल्यास कार्यक्र मास हातभार लागेल किंवा दानशूर व्यक्तींनी या पैशाचा वापर सामाजिक कार्यात करण्यासाठी सोशल मीडिया सरसावला आहे. आपल्याकडे विविधांगी संस्कृती असल्याने अनेक प्रथा-परंपरा आहेत व त्याचे आदराने आपणदेखील पालन करतो. प्रत्येक प्रथा रूढ होण्यासाठी कारणं असतात. शिवाय अशा प्रथा पूर्वापार चालत आलेल्या असतात. त्यापैकी एक अशीच आपल्या समाजातील प्रथा म्हणजे विविध कार्यक्रमात पुरुषांना टॉवेल-टोपी किंवा शाल-श्रीफळ व महिलांना साडी-चोळी भेट देण्याची प्रथा आहे. त्यापैकी जागरण गोंधळ, दशक्रि या विधी, वर्षश्राद्ध, वास्तुशांती अशा ठिकाणी जास्त प्रचलित आहे. या प्रथेचे मुख्य कारण हे मानपान किंवा इतर काही मदतदेखील असावे. परंतु सद्यपरिस्थितीत या गोष्टींची किती आवश्यकता आहे याचा वास्तवादी विचारदेखील व्हायला पाहिजे. शिवाय भेट दिल्या जाणाऱ्या वस्त्रांची गुणवत्ता कधी कधी वापरण्या इतपतही चांगली नसते, फक्त आपण कार्यक्रमाला उपस्थित आहोत हे दाखविण्यासाठी सध्या किंवा त्याने आपल्याला दिले म्हणून आपण दिले पाहिजे यासाठी याचा उपयोग होतोय, असे उपहासाने म्हटले तर वावगे ठरणार नाही. कधी कधी तर ज्या व्यक्तीला आपण ही भेट देतो त्यावेळी इतकी गर्दी झालेली असते की त्याचं साधं लक्षही आपल्या भेटीकडे नसते. परंतु जमणाºया शाल, टोप्या, टॉवेल यांचा मोठा ढीग तयार होऊन ते शेवटी पोत्यात भरावे लागतात. मग कशासाठी एवढा अनावश्यक खर्च. त्यामुळे अशा पैशांचा वापर योग्य ठिकाणी करण्यासाठी विचार करणे गरजेचे आहे. याबाबत जनजागृतीसाठी मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
कार्यक्र मासाठी आर्थिक मदत
सरासरी एक टॉवेल, टोपी किंवा शाल-टोपीसाठी १०० रुपये खर्च पकडला आणि कमीत कमी ५०० नग भेटीत आले तर अनावश्यक अशा पन्नास हजार रु पयांचा खर्च त्या एका कार्यक्र मात होतो. त्यापेक्षा हेच १०० रु पये पॉकेटमध्ये टाकून त्या व्यक्तीला दिले तर नक्कीच त्याला कार्यक्र माच्या खर्चासाठी मोठी आर्थिक मदत होईल.
कालानुरूप परंपरा बदलण्याचे आवाहन ....
प्रचलित असलेल्या प्रथांबाबत विचार करणे गरजेचे असून, काही रुढी, पारंपरिक पद्धती, कालानुरूप बदलाव्या लागतात किंवा बदलणे गरजेचे असते. जुनं ते मोडू नये आणि नवे करू नये ही वृत्ती बदलून समाजोपयोगी नवीन रुढी-परंपरा सुरू करण्यास काय हरकत आहे? त्यामुळे नवीन पिढी याचे स्वागतच करेल.