गोदावरी स्वच्छतेसाठी विद्यार्थ्यांचा तरंगत्या सायकल चा प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 01:22 PM2018-02-27T13:22:45+5:302018-02-27T13:22:45+5:30
सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे.
नाशिक : सायकलच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्यांच्या माध्यमातून बॉक्स तयार करून त्यामध्ये रिकामे झाकण बंद पाण्याचे जार बसवून इस्पॅलियर शाळेतील विद्यार्थ्यांनी पाण्यावर तरंगणारी सायकलचा प्रयोग यशस्वी केले आहे.
इस्पॅलियर शाळेतील सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकतेला संशोधनाची जोड देत तयार केलेल्या या तरंगत्या सायकलचा उपयोग गोदावरी नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठीही मोठा फायदा होणार आहे. गोदावरीच्या पाण्यावर तयार होणाऱ्या पानवेली काढण्यासाठी या तरंगत्या सायकलच्या पुढील बाजूस विशिष्ठ पद्धतीचे रचनाही करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या या संशोधनामुळे जलप्रदुषण कमी करण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे.राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी ही तरंगती सायकल तयार केली आहे. जगविख्यात शास्त्रज्ञ आर्किमिडीज यांच्या सिद्धांतानुसार जेव्हा वस्तू पाण्यात बुडवतो तेव्हा त्याच्या वजनात घट होते. ज्या वस्तूची घनता कमी असते, तेव्हा ती पाण्यावर तरंगते आणि घनता वाढली तर ती पाण्यात बुडते. वस्तूची घनता आणि घनफळ हे व्यस्त प्रमाणात असते. या सिद्धांताचा अभ्यास करून इस्पॅलियर शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत तरंगती सायकलचा प्रयोग प्रत्यक्षात साकारला आहे. विद्यार्थ्यांनी सायकलचा वापर करत चाकांच्या दोन्ही बाजूंना लोखंडी पट्ट्यांचे चौकटी रॅकेट बसविण्यात आले आहे. त्या चौकटीमध्ये झाकण बंद असलेले पाण्याचे आठ रिकामे जार बसविण्यात आले आहे.
हवेचा दाब आणि प्लास्टिकच्या या जारमुळे सायकल पाण्यावर सहजरित्या तरंगते. या पँडलच्या माध्यमातून सायकल पाण्यावर चालवली जाते. या सायकलच्या पुढे लोखंडी पट्टी बसविण्यात आली असून तिला प्लास्टिकचे जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीच्या माध्यमातून पाण्यात असलेला कचरा, प्लास्टिक, पानवेली, हिरवे गवत असे सर्वकाही सहजरित्या काढता येत असल्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी गोदाघाटवर करून ते यशस्वी केले.
नदीच्या प्रदुषण मुक्तीसाठी विद्यार्थ्यांची ही तरंगती सायकल बहुउपयोगी ठरल्यानंतर विद्यार्थ्यांनी आर्किमिडीज युरेका असा एकच जयघोषही केला. शास्त्र शिक्षिका कल्याणी जोशी, जॅक्सन नाडे, मुख्याध्यापिका अंकिता कुर्या यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
विद्यार्थ्यांची संशोधनातून निर्मिती
अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांनी संशोधन व कल्पकतेचा योग्य वापर करत ही तरंगती सायकल तयार केली आहे. या सायकलचा वापर करून गोदावरी नदीचे पात्र स्वच्छ करण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो. याचे प्रात्यक्षिकही गोदाघाटावर करून पाहिले. त्यामुळे या प्रयोगातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकेल, अशी प्रतिक्रीया इस्पॅलियर स्कूलचे शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी व्यक्त केले आहे.