अस्थिविसर्जन करणाऱ्यांच्या शेतात उपयुक्त झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:58 PM2019-12-22T22:58:01+5:302019-12-23T00:23:32+5:30
शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे.
घोटी : शेकडो वर्षांपासून सुरू असलेली अस्थिविसर्जनाची परंपरा बंद करण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील साकूर ग्रामपंचायतीने अनोखा उपक्र म हाती घेतला आहे. नद्यांमध्ये रक्षा विसर्जन न करता शेतात रक्षाविसर्जन करणाºया प्रत्येक कुटुंबाच्या शेतात उपयुक्त झाडे लावण्यासाठी ग्रामपंचायतीने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संत गाडगेबाबा स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर अखंड हरिनाम सप्ताहातील प्रबोधनाचा अंगीकार ग्रामपंचायतीने केला आहे. आपल्या माणसांच्या स्मृती झाडांमधून जिवंत राहण्यासाठी या उपक्रमांतून प्रदूषण समस्या सुटणार आहे.
इगतपुरी तालुक्यातील साकूर हे गाव अत्यंत जागरूक गाव म्हणून ओळखले जाते. नुकत्याच पार पडलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात अस्थिविसर्जन आणि प्रदूषण विषयावर कीर्तनकारांनी प्रबोधन केले. याचवेळी संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिन होता. इथले ग्रामस्थ जे चांगले आहे ते स्वीकारून अंगीकार करतात. शुक्र वारी गावातील कै. तुळसाबाई विष्णू पावसे यांच्या निधनानंतर शनिवारी त्यांच्या अस्थी आणि रक्षा विसर्जन कुठल्याही नदीत करून प्रदूषित न करण्याचा दूरगामी निर्णय त्यांच्या परिवाराने घेतला. परंपरेच्या नावाखाली प्रदूषणात भर पाडणाºया प्रथा बंद करण्यासाठी पावसे परिवाराने स्वत:च्या शेतात रक्षाविसर्जन करण्याचा प्रेरणादायी निर्णय घेतला. साकूर ग्रामपंचायतीकडून आज पावसे यांच्या शेतात उपयुक्त झाडांचे रोपण करण्यात आले. कै. तुळसाबाई पावसे यांच्या निधनानंतर पती विष्णू पावसे, मुलगा तथा माजी उपसरपंच बाळासाहेब पावसे, दुसरा मुलगा तथा सोसायटी संचालक सुरेश पावसे यांनी अस्थिविसर्जन नदीत न करता स्वत:च्या जमिनीत करून सर्वांसमोर आदर्श उभा केला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेला फाटा देऊन साकूरकर पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचे अभिमानास्पद काम करीत आहे.