माहिती अधिकाराचा वापर करुन खंडणी मागणा-या दोघांना अटक
By admin | Published: September 9, 2016 10:01 PM2016-09-09T22:01:45+5:302016-09-09T22:01:45+5:30
माहितीच्या अधिकारांचा वापर करत दमदाटी देऊन खुनाची धमकी देत रोख दोन लाख रुपयांची खंडणी घेणा-या दोघा जणांना क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने सापळा रचुन अटक केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ९ - गोविंदनगर येथील उज्वलम् अॅग्रो मल्टिस्टेट सोसायटीच्या संचालकाला माहितीच्या अधिकारांचा वापर करत दमदाटी देऊन खुनाची धमकी देत रोख दोन लाख रुपयांची खंडणी घेणा-या दोघा जणांना क्राईम ब्रॅँच युनिट तीनच्या पथकाने सापळा रचुन अटक केली आहे. विशेष म्हणजे संशयिताच्या दुकानात दोन गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे मिळुन आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नासर्डी पुल कामत हॉटेल मागील वृंदावन कॉलनीत राहणारे रामचंद्र भागवत यांचे इंदिरानगर भागातील गोविंदनगर येथे उज्वलम् अॅग्रो मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटी नावाच्या फर्मचे कार्यालय आहे. सामाजिक व आरटीआय कार्यकर्ता म्हणून वावरणारा गणेश वामन कंकाळ (वय ३८) रा. राधानिवास, राजवाडा मधुकर नगर, पाथर्डीगाव याने उज्वलम् अॅग्रोचे भागवत यांच्याकडे माहितीच्या अधिकारात अर्ज दिला होता. तुमची कंपनी बोगस आहे, चुकीचे कामे करते असे म्हणत कंकाळ गेल्या काही दिवसांपासून धमकावत होता.
कंकाळ यांचा दुसरा सहकारी प्रशांत मधुकर अलई (वय ३२) रा. स्वामी हाईटस्, आरटीओ जवळ पेठरोड, पंचवटी हा देखील भागवत यांना धमकावत होता. अलई यांचे राणेनगर भागात स्पंदन झेरॉक्स व सायबर कॅफे आहे. कंकाळ व अलई या दोघांनी ५० लाखांच्या खंडणीची मागणी करत दमदाटी करून खुनाची धमकी दिली होती.
भागवत यांनी सदर प्रकाराबाबत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्याशी संपर्क साधुन सर्व प्रकार सांगितला. कंकाळ, अलई यांचे भागवत यांच्याशी बोलणे होत ३ लाख रुपयांवर तडजोड झाली. मात्र भागवत यांनी माझ्याकडे दोन लाख रुपये आहे ते देतो असे सांगितले. शुक्रवारी दुपारी भागवत स्पंदन झेरॉक्स या दुकानात कंकाळ व अलई यांना पैसे देण्याचे ठरले. त्यानुसार क्राईम ब्रॅँच युनिट तीनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहळदे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, गंगाधर देवडे, सुभाष गुंजाळ, बाळासाहेब दोंदे, मुक्तार पठाण, रवींद्र बागुल, संजय मुळक, विलास गांगुर्डे, गंगाधर केदार, आत्माराव रेवगडे, मोहन देशमुख, राजेंद्र जाधव आदिंनी सापळा रचला होता. भागवत यांच्याकडून दोन लाख रुपये खंडणीची रक्कम घेत असतांना सापळा रचलेल्या पोलिसांनी कंकाळ, अलई या दोघांना रंगेहाथ पकडले. यावेळी पोलिसांनी स्पंदन झेरॉक्स दुकानाची झडती घेतली असता काऊंटरच्या ड्रॉवरमध्ये दोन गावठी कट्टे व ३० जिवंत काडतुसे मिळुन आली. पोलिसांनी दोन लाखांची रोकड, दोन गावठी कट्टे, ३० जिवंत काडतुसे, दोन मोबाईल, दोन मोटारसायकली असा ४ लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती गुन्हे विभाग पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे यांनी दिली.