रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सलाईनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 12:54 AM2020-07-20T00:54:31+5:302020-07-20T00:54:52+5:30
बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सटाणा : बागलाण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे कोरोनाच्या संकटकाळात पूर्णपणे खिळखिळी झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील २७९ पदांपैकी तब्बल ७५ पदे रिक्त असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बागलाण हा आदिवासीबहुल तालुका आहे. १७१ गावे असलेला हा भौगोलिकदृष्ट्या सर्वाधिक मोठा तालुका म्हणून परिचित आहे. साल्हेर- मुल्हेरसह पश्चिम भाग हा पूर्णत: आदिवासी भाग असताना तालुक्यातील आदिवासी भागासह सर्वसामान्य जनतेला प्राथमिक आरोग्यसेवा या रिक्त पदांमुळे मिळणे अवघड बनले आहे.
वास्तविक बागलाणमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून ठिकठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र उभारली आहेत, तरीदेखील सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सोयीसुविधा मिळणे दुरापास्त झाले आहे. तालुक्यात कोरोनासारख्या महाभयंकर रोगाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीत या रिक्त पदांची भरती होणे गरजेचे असताना आरोग्य विभागाकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. शासनाने याचा विचार करून तत्काळ रिक्त पदांची भरती करणे आवश्यक आहे, अन्यथा कोरोनाच्या संकटकाळात सर्पदंश, मलेरिया यासह अन्य आजार बळावून जनजीवन विस्कळीत होण्याची भीती आहे.
तालुक्यातील सटाणा, नामपूर, डांगसौंदाणे या तीन ठिकाणी ग्रामीण रु ग्णालयाच्या माध्यमातून तर अकरा ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच ५३ आरोग्य उपकेंद्रांच्या माध्यमातून आरोग्यसेवा दिली जात आहे. तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे त्यावर नियंत्रण असते. वैद्यकीय अधिकारी वर्गाची सर्वाधिक १२ पदे रिक्त असल्याने सर्वसामान्य जनतेला व रुग्णांना उपचारासाठी खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत असल्याने आदिवासी भागातील जनतेची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे.