मनपातील रिक्त पदांमुळे कामातील गती थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:59 AM2019-05-23T00:59:04+5:302019-05-23T00:59:22+5:30
महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षात तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून, सद्यस्थितीत महापालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होत असून, कामाची गतिमानता कमी झालेली आहे.
नाशिक : महानगरपालिकेत चालू आर्थिक वर्षात तब्बल १२२ अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त होणार असून, सद्यस्थितीत महापालिकेचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून असल्याने मोठ्या प्रमाणात कामाचा ताण होत असून, कामाची गतिमानता कमी झालेली आहे.
नाशिक महापालिकेत सध्या ७०८२ पदांचा आकृतिबंध मंजूर असून, त्यातील २०९६ पदे रिक्त असल्याने या दोन हजार पदांचा अतिरिक्त कारभार कनिष्ठ अधिकाऱ्यांवर सोपवावा लागत असल्याने कामाचा प्रचंड ताण वाढलेला आहे. नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे तातडीने भरण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे आमदार सीमाताई हिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. तथापि, महापालिकेच्या आकृतिबंध मंजुरीस विलंब करणाºया सरकारला भाजपा आमदाराने घरचा आहेर दिला आहे.
महापालिकेचा कारभार हा सध्या प्रभारी अधिकाºयांच्या भरवशावर सुरू आहे. सद्यस्थितीत दोन अतिरिक्त आयुक्तांसह तीन उपायुक्तांची पदे रिक्त आहेत. महापालिका क वर्गातून ब वर्गात गेली असली तरी पालिकेचा सुधारित आकृतिबंध मंजूर झालेला नाही. क वर्गानुसार पालिकेचा आकृतिबंध हा ७०८२ पदांचा होता, परंतु त्यातून जवळपास २०८० अधिकारी व कर्मचारी आता सेवानिवृत्त झालेले आहेत तर ब वर्गानुसार महापालिकेने चौदा कर्मचारी व अधिकारी पदाचा आकृतिबंध मंजुरीसाठी शासनाकडे पाठविलेला आहे. ब वर्गानुसार दोन अतिरिक्त आयुक्त व पाच उपायुक्त अशी पदे मंजूर झाली आहेत, परंतु नवीन आकृतिबंध मंजूर केलेला नाही. याउलट जुन्या आकृतिबंधानुसार पदे भरण्यास परवानगी दिलेली नाही.
कामाचा ताण वाढणार
महानगरपालिकेतील चालू आर्थिकवर्षात जवळपास १२२ अधिकारी व कर्मचारी हे सेवानिवृत्त होणार असल्याने महापालिकेच्या प्रशासनावर कामाचा मोठा ताण निर्माण होणार असल्याने नाशिक महापालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदांची भरती लवकरात लवकर करण्याबाबतचे आदेश देण्याची मागणी निवेदनाव्दारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.