अंथरुणावर खिळलेल्या ११५ जणांना घरीच लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:19 AM2021-09-07T04:19:38+5:302021-09-07T04:19:38+5:30
नाशिक : प्रत्येकाला कोरोना लसीचे संरक्षण मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकविध ...
नाशिक : प्रत्येकाला कोरोना लसीचे संरक्षण मिळावे यासाठी आरोग्य यंत्रणा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहे. अनेकविध कारणांमुळे जे रुग्ण अंथरुणाला खिळून आहेत अशांना घरी जाऊन डोस देण्यात आले असून जिल्ह्यातील अशा प्रकारच्या ११५ जणांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे संरक्षण मिळाले आहे. त्यामध्ये ६० वर्षांपुढील वयोगटापासून १८ वर्षांच्या मुलांचादेखील समावेश आहे.
कोरोनापासून संरक्षण मिळण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय सध्या तरी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नागरिकांमध्येही जागरूकता आल्याने लस घेण्याचे प्रमाण वाढले असून केंद्रांवर गर्दी होऊ लागली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि आरेाग्य यंत्रणांच्या माध्यमातून नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. सरकारी तसेच खासगी आरोग्य यंत्रणांमार्फत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ज्यांना लसीकरण करवून घ्यावयाचे आहे असे लोक केंद्रांवर जाऊन लसींचा डोस घेत आहेत. परंतु जे लोक अंथरुणावर खिळून आहेत किंवा ज्यांना शारीरिक व्याधींमुळे केंद्रापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही अशा नागरिकांच्या घरापर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे.
वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक जे अंथरुणावरून उठू शकत नाहीत तसेच जे केंद्रांवर तासनतास रांगेत उभे राहू शकत नाहीत किंवा ज्यांना मदतीसाठी कुणीही नाही अशा वृद्धांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचली आहे. त्यांच्यासाठी नाशिक व मालेगाव महापालिका हद्द आणि ग्रामीण भागात विशेष लसीकरण आयोजित करण्यात आले होते. ही मोहीम यापुढेही सुरूच राहणार असून अनेक वयोवृद्धांपर्यंत यंत्रणा पोहोचणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठीच दिव्यांग बांधवांसाठीही स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. लसीकरण केंद्रांवर त्यांच्यासाठी खास व्यवस्था आणि मोहीम राबविण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांचेही लसीकरण केले जात आहे. जिल्ह्यात १ हजार ६४३ दिव्यांग्यांना लस देण्यात आली आहे.
---इन्फो==
दिव्यांग्य लसीकरण:
६० वर्षे वयोगट
पहिला डोस : २३४
दुसरा डोस : १०८
४५ ते ५९
पहिला डोस : ३१४
दुसरा डोस : २२४
१८ ते ४४
पहिला डोस : ५८८
दुसरा डोस : १७५
--इन्फो--
अंथरुणावर खिळलेल्यांचे लसीकरण
६० वर्षे वयोगट
पहिला डोस : ४८
दुसरा डोस : २०
४५ ते ५९
पहिला डोस : २७
दुसरा डोस : ११
१८ ते ४४
पहिला डोस : ६
दुसरा डोस - ३