बारावीच्या शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करा ; नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:07 AM2021-05-04T04:07:17+5:302021-05-04T04:07:17+5:30
नाशिक : कोरोना महामारीचे संकट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोना रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने ...
नाशिक : कोरोना महामारीचे संकट प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत असताना कोरोना रुग्णांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षा घेणे योग्य ठरणार नसल्याचे नमूद करीत बारावीच्या परीक्षा रद्द करा अथवा परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या सर्व शंभर टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण करा अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे करण्यात आली आहे.
कोरोनामुळे पहिली ते नववीसह अकरावीच्या आणि दहावीच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बारावीच्या परीक्षांचे काय होणार याविषयी विद्यार्थी आणि पालकांसोबतच शिक्षक आणि राज्य शिक्षण मंडळात परीक्षेसंदर्भातील काम करणारी सर्वच यंत्रणा अस्वस्थ आहे. बारावीच्या परीक्षेसंदर्भात पालक शाळांच्या मुख्याध्यापकांना फोन करून ,सोशल मीडियाच्या माध्यमातून व मेसेज करून त्यांची नाराजी व्यक्त करीत असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे बारावीच्या परीक्षा घ्यायच्याच असतील तर सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना शंभर टक्के लसीकरण करावे व सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना विमा सुरक्षा कवच दयावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना सर्व वैद्यकीय सुविधा पुरविण्यासोबत परीक्षा विभागात काम करणाऱ्या यंत्रणेला लसीकरण करून विमा कवच द्यावे अशी मागणी नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यासह शिक्षणआयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण संचालक डी. जे. जगताप यांच्याकडे मेलद्वारे पाठविलेल्या पत्रात केली आहे. या पत्रावर नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख . उपाध्यक्ष प्रदीप सांगळे, माणिक मढवई , राजेंद्र सावंत, प्रा. संगीता बाफना, परवेजा शेख, अशोक कदम, बी. डी. गांगुर्डे, एम. व्ही. बच्छाव , दीपक व्याळीज, डी. एस. ठाकरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.