देहविक्री करणाऱ्या ५५ महिलांचे विशेष सत्रात लसीकरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:14 AM2021-08-01T04:14:58+5:302021-08-01T04:14:58+5:30
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी अनेक घटक इच्छुक असले तरी त्यासाठी आधार कार्डासारखे पुरावे असतीलच असे नाही. मात्र, शासनाच्या ...
नाशिक : कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी अनेक घटक इच्छुक असले तरी त्यासाठी आधार कार्डासारखे पुरावे असतीलच असे नाही. मात्र, शासनाच्या विशेष येाजनेंतर्गत नाशिक महापालिकेने वंचित किंवा अन्य घटकांसाठीदेखील लसीकरण सुरू केले असून, शनिवारी (दि.३१) देहविक्री करणाऱ्या ५५ महिलांचे लसीकरण करण्यात आले. जानेवारी महिन्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण केल्यानंतर टप्प्याटप्प्याने सामान्य नागरिकांसाठीदेखील लसीकरण खुले करण्यात आले असले तरी अनेक नागरिकांना लसीकरणात अडथळे येत आहेत. विशेषत: अनेक समाजघटकांकडे आधार कार्ड नसल्याने त्यांची पोर्टलवर नोंद ठेवण्यात अडचण येत आहेत. वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, किन्नर, देहविक्री करणाऱ्या महिला, वाघ्या-मुरळी इतकेच नव्हे तर काही भटक्या जमातींकडेदेखील आधार कार्ड नसल्याने अडचण येत आहे. अशा वंचित घटकांसाठी मात्र विशेष मोहीम राबवून लसीकरण करण्यात येते. देहविक्री करणाऱ्या महिलांच्या लसीकरणासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या आसावरी देशपांडे यांनी पुढाकार घेतला होता. त्यासंदर्भात संस्थेने महापालिकेला पत्र दिल्यानंतर आयुक्त कैलास जाधव यांनीदेखील विशेष बाब म्हणून लसीकरणाची तयारी दर्शवली होती. त्यानुसार शनिवारी (दि.३१) महात्मा फुले कलादालनाजवळील कक्षात देहविक्री करणाऱ्या महिलांचे लसीकरण करण्यात आले.
दिवसभरात ५५ महिलांचे लसीकरण करण्यात आले आहे. उरलेल्या महिलांसाठीदेखील लवकरच लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहितीही देशपांडे यांनी दिली. इतकेच नव्हे तर किन्नरांसाठीदेखील लसीकरण सत्र आयोजित करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट...
वृध्दाश्रम, बंदीवान किंवा देहविक्री करणाऱ्या महिलांसाठीदेखील एखाद्या संस्थेच्या माध्यमातून त्यांच्या नोंदी घेऊन लसीकरण केले जाते. शनिवारी (दि.३१) देहविक्री करणाऱ्या महिलांचे लसीकरण झाले आहे.
- डॉ. अजिता साळुंखे, मनपा लसीकरण अधिकारी