आजपासून ५८ केंद्रांवर लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2022 01:17 AM2022-01-03T01:17:56+5:302022-01-03T01:20:05+5:30
१५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत.
नाशिक : १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सोमवारपासून (दि.३) जिल्ह्यात सुरुवात करण्यात येत असून, त्यासाठी शहर व ग्रामीण मिळून ५८ केंद्रे सज्ज करण्यात आली आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते नाशिक महापालिकेच्या बिटको रुग्णालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने किशोरवयीन मुलांमध्ये कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून, या मुलांना कोव्हॅक्सिन डोस दिला जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात सुमारे साडेतीन किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी ग्रामीण भागातील रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये अशा ४६ ठिकाणी लसीकरण केंद्रे आहेत, तर मालेगाव व नाशिक महापालिका हद्दीत प्रत्येकी सहा केंद्रे आहेत. या लसीकरणासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन असले तरी, सॉफ्टवेअरमधील तांत्रिक दोषामुळे ऑनलाइन नोंदणी होऊ शकलेली नाही. मात्र प्रत्येक केंद्रावर शंभर लसीकरणाचे उद्दिष्ट असल्यामुळे ५८०० डोस दरदिवसा देण्याचे ठरविण्यात आले आहे.