लसीकरणामुळे आता ‘नो कोरोना’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:13 AM2021-01-17T04:13:34+5:302021-01-17T04:13:34+5:30
नाशिक : देशवासीयांना ज्या क्षणाची तब्बल १० महिने प्रतीक्षा करावी लागली, त्या लसीकरण मोहिमेला अखेर जिल्ह्यातील १३ केंद्रांमध्ये शनिवारी ...
नाशिक : देशवासीयांना ज्या क्षणाची तब्बल १० महिने प्रतीक्षा करावी लागली, त्या लसीकरण मोहिमेला अखेर जिल्ह्यातील १३ केंद्रांमध्ये शनिवारी (दि.१६) प्रारंभ झाला. जिल्हा रुग्णालयाचे कर्मचारी मिलिंद पवार यांना सिव्हिलमध्ये पहिली लस देऊन जिल्ह्यातील लसीकरण मोहिमेस सुरुवात झाली. जिल्हा रुग्णालयातील लसीकरणाचा शुभारंभ विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, आरोग्य उपसंचालक डॉ.जी.डी. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.रत्ना रावखंडे, डॉ.निखील सैंदाणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
जिल्हा रुग्णालयात शनिवारी प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन आणि भगवान धन्वंतरीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर, प्रतीक्षालय कक्षात पहिल्या कर्मचाऱ्याची नोंदणी करुन झाल्यानंतर, त्यांना लसीकरण कक्षात नेऊन तिथे लस देण्यात आली, तसेच लस दिल्यानंतर निरीक्षण कक्षामध्ये त्यांना अर्धा तास थांबवून त्यांना कोणताही त्रास होत नाही, याची खातरजमा करून घेतल्यानंतर त्यांना पुन्हा कामाच्या जागी जाण्याची मुभा देण्यात आली. पहिली लस दिलेल्या पवार यांचे केंद्रात येताना, तसेच तिथून बाहेर पडतानाही डॉ.रावखंडे यांच्याकडून स्वागत करण्यात आले.
इन्फो
प्रत्येक केंद्रावर प्रतिदिन १०० लस
जिल्ह्यातील १३ केंद्रांवर आठवड्यातील ४ दिवस सुमारे १०० लस देण्यात येणार आहेत. त्यामुळे या १३ केंद्रांवर निर्धारित दिवशी प्रत्येकी १०० याप्रमाणे १,३०० लस देण्यात येणार आहेत. संबंधित केंद्रातील वरिष्ठ अधिकारी त्या केंद्रात कोणत्या चार दिवसांना लसीकरण करणार, कुणाला करणार, त्याबाबतची माहिती संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या मोबाइलवर मेसेजद्वारे दिली जाणार आहे.
इन्फो
प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश
लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांची निवड ही संबंधित व्यवस्थापनाने केलेली आहे. त्यात कोरोना रुग्णांशी थेट संपर्क येणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देतानाच, प्रत्येक विभागातील पाच-सात कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला असल्याने, सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांपर्यंत पहिल्या दिवसापासूनच लस पोहोचली आहे.
इन्फो
बिटकोमध्ये महापौरांच्या उपस्थितीत प्रारंभ
नाशिक रोडमधील बिटको हॉस्पिटलच्या नवीन इमारतीत या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त कैलास जाधव, आमदार सरोज अहिरे, डॉ.आवेश पलोड, डॉ.धनेश्वर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. बिटको हॉस्पिटलमध्ये संदेश सोनवणे या आरोग्य कर्मचाऱ्यास पहिली लस देण्यात आली, तर पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातही पहिली लस देण्यात आली.
इन्फो
पहिल्या फेरीत १९ हजार ५४८ लस
शनिवारपासून सुरू झालेल्या या लसीकरणाच्या पहिल्या फेरीत जिल्ह्यातील १९ हजार ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना येत्या २७ दिवसांत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर, २८व्या दिवशी पुन्हा पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांना दुसरी लस दिली जाणार आहे.
त्यामुळे लसींचा हा पहिला टप्पा पूर्ण होण्यास सुमारे महिनाभराचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच त्यांचे लसीकरण पूर्ण होणार आहे.
कोट
ऐतिहासिक लसीकरण
जगातील सर्वात मोठ्या अशा लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला असून, या मोहिमेद्वारे कोरोनाच्या समूळ उच्चाटनास प्रारंभ झाला आहे. नाशिकच्या १३ केंद्रांसह विभागातील सर्व ४० केंद्रांवर ही मोहीम सुरू झाली असून, पहिल्या टप्प्यात सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जात आहे. त्यानंतर, पुढील टप्प्यात महसूल आणि कोरोनासंबंधित विभागातील कर्मचारी, तसेच ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात येणार आहे.
कोट
माझा आत्मविश्वास वाढला
नाशिकमध्ये लसीकरण मोहिमेत सर्वप्रथम मला लस मिळाल्याने, मला खूप आनंद झाला आहे. कोरोना रुग्णांची सेवा करताना मला माझ्याबरोबरच माझ्या कुटुंबाची काळजी वाटायची. मात्र, आता माझा आत्मविश्वास वाढला असल्याने, अधिक प्रभावीपणे काम करता येईल. कोरोनाची लस माझ्याप्रमाणेच सर्वांनी घेतल्यास आपण निश्चितपणे कोरोनावर मात करू, असा विश्वास वाटतो.
फोटो
राजू ठाकरे, प्रशांत खरोटे, नीलेश तांबे