सुटीच्या दिवशी लसीकरणाने घेतली उसळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 01:25 AM2022-03-21T01:25:33+5:302022-03-21T01:25:55+5:30
जिल्ह्यातील लसीकरण ९० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात तब्बल ५७ हजार इतके लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची टक्केवारी आणखी वाढली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ८३ लाख तीन हजार ४४२ इतके लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.
नााशिक : जिल्ह्यातील लसीकरण ९० टक्के पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर शनिवार आणि रविवार या सुटीच्या दिवशी राबविलेल्या मोहिमेतून जिल्ह्यात तब्बल ५७ हजार इतके लसीकरण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या लसीकरणाची टक्केवारी आणखी वाढली आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत एकूण ८३ लाख तीन हजार ४४२ इतके लसीकरण झाल्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील पहिला डोसची टक्केवारी ८४ टक्के, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ६३ टक्के इतकी आहे. त्यामुळे नाशिक महापालिकावगळता जिल्ह्यात अजूनही निर्बंध कायम असल्याने ९० टक्के लसीकरण झाल्याशिवाय निर्बंधमुक्ती नसल्याने जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी लसीकरण मोहीम व्यापक करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांनी सुटी न घेता पुढील आठ दिवसात लसीकरणासाठी विशेष शिबिरे घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार आरेाग्य कर्मचाऱ्यांनी शनिवार आणि रविवारीदेखील लसीकरणाची मोहीम राबविली आणि या दोन दिवसात ५० हजारांच्या पुढे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
शासकीय सुटीच्या दिवशी शनिवारी सायंकाळपर्यंत ४२ हजार ५९५ इतके लसीकरण करण्यात आले, तर रविवारी १४,६३५ इतके लसीकरण करण्यात आले आहे. सुटीच्या दिवशी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गाव खेड्यात, वाड्यापाड्यांवर जाऊन उन्हातान्हात ही मोहीम राबविली. शनिवारी ७३०४ जणांनी पहिला, ३२,५३१ जणांनी दुसरा डोस घेतला, तर ९३३ जणांना प्री-कॉशन डोस देण्यात आला. १२ ते १४ वर्ष वयोगटातील १८२७ बालकांनी डोस घेतले.
रविवारी सायंकाळपर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार १४,६३५ एकूण डोस देण्यात आले. पहिला डोस १७००, तर दुसरा डोस ११,१३७ जणांनी घेतला असून, एकाच दिवसात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने गेल्या दोन दिवसातील मोहिमेमुळे लसीकरणाची टक्केवारी वाढण्यास मदत होणार आहे.
--इन्फो--
इगतपुरी, सुरगाण्यात अल्पप्रतिसाद
जिल्ह्यात एकीकडे लसीकरणाला काही प्रमाणात प्रतिसाद मिळत असताना इगतपुरी, नाशिक, सुरगाणा, येवला आणि चांदवड तालुक्यातील काही ब्लॉक्समध्ये पुरेसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही.