लसीकरण, ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरून लोकप्रतिनिधी संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:16 AM2021-05-09T04:16:03+5:302021-05-09T04:16:03+5:30
आमदार दिलीप बनकर यांनी लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून लस कमी असेल तर प्रामुख्याने ४५च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात ...
आमदार दिलीप बनकर यांनी लसीकरणाचा मुद्दा उपस्थित करून लस कमी असेल तर प्रामुख्याने ४५च्या पुढील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी बेड राखीव ठेवावेत, अशी मागणी केली. आमदार राहुल आहेर यांनी, ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा नसल्यामुळे अनेक रुग्णालयात रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याचे सांगून, शासकीय रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या पुरवठादारांचे देयके अदा न केल्याने त्यांच्याकडून आता रिफलिंग केले जात नसल्याची तक्रार केली. खासदार भारती पवार यांनी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर टीका केली. बँकांमध्ये होणारी गर्दीवर कोणाचेच नियंत्रण नसल्याचे सांगितले. तसेच तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचे सांगितले जात असल्याने कुपोषित बालकांवर आत्तापासूनच लक्ष केंद्रित करण्याची गरज विशद केली.
चौकट===
भुजबळ-आहेर यांच्यात खडाजंगी
आमदार राहुल आहेर यांनी जिल्हा रुग्णालयातील बेडचा प्रश्न उपस्थित केला. ७५० बेडची क्षमता असलेल्या रुग्णालयात फक्त दोनशे बेड कोरोनासाठी वापरले जात आहे, अशी तक्रार करून त्यांनी संपूर्ण बेड कोरोनासाठी वापरले जावे, अशी मागणी केली. त्यावर भुजबळ यांनी नव्याने दीडशे बेड लवकरच सुरू होतील, असे सांगितले. त्यावर मग इतके दिवस प्रशासनाने काय केले, असा सवाल आहेर यांनी केल्यामुळे बैठकीत वातावरण गरम झाले. भुजबळ यांनी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे नुसते बेड सुरू करून काय करणार, असे उत्तर दिले. त्यावरून दोघांमध्ये खडाजंगी झाली. ग्रामीण भागात सर्वच रुग्णालये कोरोनाचे केल्यामुळे अन्य आजारावर उपचार होत नसल्याची तक्रारही त्यांनी केली. अखेर आमदार आहेर यांच्यासमवेत जिल्हा रुग्णालयाची पाहणी करण्याचे ठरून वादावर पडदा टाकण्यात आला.