लसीकरण इच्छुकांमध्ये पडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 04:11 AM2021-03-30T04:11:07+5:302021-03-30T04:11:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कोरोना खूप वेगाने पसरू लागल्याने तसेच १ एप्रिलपासून शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोरोना खूप वेगाने पसरू लागल्याने तसेच १ एप्रिलपासून शासनाकडून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांना लस दिली जाणार असल्याने लसींच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला लस कमी पडण्याचे प्रकार गत दोन आठवड्यांपासून घडत असताना १ एप्रिलपासून तर लसींचा तुटवडा अधिकच भासण्याची भीती व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये सातत्याने लसींचा साठा केवळ दोन-तीन दिवसांपुरताच उपलब्ध राहत आहे. त्यात कोरोना वाढू लागल्यावर नागरिकांकडून लसीच्या मागणीतही वाढ झाल्याने गत दोन-तीन आठवड्यांपासून साठ्याबाबत सातत्याने अनिश्चिततेची स्थिती कायम आहे. सध्या हीच परिस्थिती कायम असल्याने लसीकरणाला अधिक वेग देण्यातदेखील जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागासाठी अशक्य ठरू लागले आहे.
कोरोना संसर्गात नाशिक राज्यात अव्वल शहरांमध्ये येऊ लागल्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहिमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यात घेण्यात आला होता. त्यानुसार लसीकरण केंद्रेदेखील वाढविण्यात आली आहेत. लसीकरण करण्यास इच्छुकांच्या संख्येत १ एप्रिलपासून प्रचंड मोठी वाढ होण्याची शक्यता असली तरी तितक्या मुबलक प्रमाणात लसींचा साठादेखील उपलब्ध होण्याची नितांत आवश्यकता आहे.
इन्फो
पुरवठा कैकपटींनी वाढवण्याची गरज
जिल्ह्यासाठी सध्या उपलब्ध होणारा साठा केवळ तीन-चार दिवसच पुरतो. अशा परिस्थितीत लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस संपुष्टात आल्याने परत जावे लागले. त्यामुळे मनपाच्या वतीने दीड लाख लसींचे डोस मागवले असले तरी अद्याप असा मोठा लस साठा मिळालेला नाही. नवीन लसींचा स्टॉक कधी मिळणार, त्याबाबतही निश्चिती नाही. १ एप्रिलपूर्वी इतका मोठा लससाठा मिळाल्यास निदान दीड ते दोन आठवड्यांच्या कालावधीत लसीकरणाचे प्रमाण कितीही वाढले तरी तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊनच लवकरात लवकर लसींचा मोठा स्टॉक नाशिकला मिळण्याची नितांत गरज आहे.