होळीनंतर पुन्हा लसीची बोंब !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:14 AM2021-03-28T04:14:58+5:302021-03-28T04:14:58+5:30
नाशिक : जिल्ह्यात शनिवारपर्यंत शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ३१ हजारच लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना वाढू लागल्यावर ...
नाशिक : जिल्ह्यात शनिवारपर्यंत शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये मिळून एकूण ३१ हजारच लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना वाढू लागल्यावर नागरिकांकडून लसीच्या मागणीतही वाढ झाल्याने सध्याच्या परिस्थितीत हा साठा सोमवारपर्यंतच पुरण्याची शक्यता आहे. त्यामुळे रविवारच्या होळीनंतरच्या दुसऱ्याच दिवसापासून अर्थात सोमवारपासून पुन्हा नागरिकांना लसींसाठी ओरड करण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत.
कोरोना संसर्गात नाशिक राज्यात अव्वल शहरांमध्ये येऊ लागल्यामुळे आरोग्य विभागासह प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला वेळीच अटकाव करण्यासाठी लसीकरण मोहीमेला अजून वेग देण्याचा निर्णय गत आठवड्यातच करण्यात आला होता. त्यानुसार शुक्रवारपासून लसीकरण केंद्रेदेखील वाढविण्यात आली आहेत. तसेच नागरिकदेखील कोरोनाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने लस घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध केंद्रांवर गर्दी करीत आहेत. शासनाने नाशिकमध्ये कोव्हिशील्ड आणि कोवॅक्सिन अशा दोन लस उपलब्ध केल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही लस खासगी रुग्णालयांमध्ये दिली जात असून तर मनपा रुग्णालयांमध्ये कोव्हिशील्ड लस उपलब्ध केली आहे.त्यात १९ हजार लस कोविशील्डच्या तर साधारण १२ हजार लस कोव्हॅक्सिनच्या उपलब्ध आहेत. त्यात शहरात दररोज सुमारे ८ हजारांवर तर जिल्ह्यात साधारणपणे ६ हजारांवर नागरिकांचे लसीकरण होत आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेला हा स्टॉक केवळ सोमवारपर्यंतच कसाबसा पुरणार आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, जुने नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय व पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयांबरोबरच एकूण २७ ठिकाणी लसीकरण सुरु करण्यात आले हाेते. मात्र, त्यातही काही वेळा लस घेण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना लस साठा संपुष्टात आल्याने परत जावे लागले होते. त्यामुळे मनपाच्या वतीने दीड लाख लसींचे डोस मागवले असले तरी अद्याप असा मोठा लससाठा मिळालेला नाही. नवीन लसींचा स्टॉक कधी मिळणार, त्याबाबतही निश्चिती नाही. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर वाढणारी गर्दी लक्षात घेऊनच लवकरात लवकर लसींचा मोठा स्टॉक नाशिकला मिळणे आवश्यक झाले आहे.