एक हजार दिव्यांगांना लसीचे संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:19 AM2021-09-08T04:19:12+5:302021-09-08T04:19:12+5:30
गणेशोत्सवासाठी अधिकृत वीजजोडणी नाशिक : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मंडळांच्या मागणीनुसार ...
गणेशोत्सवासाठी अधिकृत वीजजोडणी
नाशिक : यंदा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे त्या मंडळांच्या मागणीनुसार महावितरणकडून तात्पुरती वीजजोडणी देण्यात येणार आहे. या तात्पुरत्या जोडणीच्या वीजवापरासाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. अनधिकृत वीजजोडणीमुळे अनेकदा धोका निर्माण होऊ शकतो. उत्सवामध्ये कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून मंडळांनी अधिकृत भार मंजूर करून घ्यावा, अशी मागणी करण्यात आलेली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी साठा कमी
नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत धरणातील पाणीसाठा २० टक्के कमी झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील लहान-मोठ्या धरण प्रकल्पांमध्ये ६७ टक्के जलसाठा आहे तर मागील वर्षी हाच साठा ८७ टक्के इतका होता. जसजसा पावसाला विलंब होत आहे तसतसा धरणातील पाणीसाठादेखील कमी होत असल्याने गतवर्षी आणि यंदाच्या साठ्यातील दरी वाढत आहे. सध्या निम्म्यापेक्षा अधिक धरणांमध्ये ५० टक्केदेखील पाणीसाठा नसल्याने नाशिककरांची चिंता वाढलेली आहे.
परिमंडळात राजे उमाजी नाईक जयंती
नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे मंगळवारी (दि. ७) राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. या वेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी साहाय्यक महाव्यवस्थापक महेश बुरंगे व दिनकर मंडलिक (प्रभारी), कार्यकारी अभियंता धनंजय आहेर व नीलेश चालिकवार, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, प्रणाली विश्लेषक राजेंद्र सोनावणे, व्यवस्थापक राजा बोढारे, साहाय्यक विधि अधिकारी प्रशांत लहाने आदी उपस्थित होते.
उत्खनन जागेची पुढील आठवड्यात पाहणी
नाशिक : संतोषा, भागडी उत्खनन प्रकरणी नुकत्याच झालेल्या बैठकीत पुढील आठवड्यात स्थळ पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. मुहूर्ताची तारीख ठरलेली नसली तरी लवकरात लवकर पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. पर्यावरण राज्यमंत्री यांना याबाबतचा अहवाल सादर करावयाचा असल्याने स्थापन झालेली समिती आणि ब्रह्मगिरी कृती समिती यांचा अहवाल मंत्र्यांना सादर केला जाणार असल्याचे समजते. दरम्यान, ब्रह्मगिरी बचाव संदर्भात सुरू झालेल्या या मोहिमेबाबत जिल्हा प्रशासनाकडून लक्ष केंद्रित केले जात आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये वनविभागाचे पंकज गर्ग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आता ही मोहीम पार पाडली जाणार आहे.