गंभीर आजारी रुग्णांना लवकरच घरी जाऊन देणार लस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:13 AM2021-07-26T04:13:01+5:302021-07-26T04:13:01+5:30
नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाचे सत्र अद्याप विस्कळीत आहे. मुळात अजून ज्येष्ठांचे निम्मेदेखील लसीकरण झालेले नसून १८ वर्षांवरील लसीकरणाचे प्रमाणदेखील ...
नाशिक : जिल्ह्यात लसीकरणाचे सत्र अद्याप विस्कळीत आहे. मुळात अजून ज्येष्ठांचे निम्मेदेखील लसीकरण झालेले नसून १८ वर्षांवरील लसीकरणाचे प्रमाणदेखील खूप कमी आहे. अशा परिस्थितीत शासनाने गंभीर आजारी रुग्णांना अर्थात बेडरिडन रुग्णांना घरी जाऊन लस देण्याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या निर्णयाची अंमलबजावणी काहीशी अवघडच वाटते.
शासनाच्या प्रस्तावात वृद्धत्व, अपंगत्व, पॅरॅलिसीस, अपघात किंवा इतर आजारांमुळे अंथरुणाला खिळून असलेल्या रुग्णांना लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. अशा व्यक्तिंना लसीकरण करण्यासाठी केंद्रावर येणे किंवा आणणेदेखील शक्य नाही . त्यांना घरी जाऊन लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण मुळात केंद्रांवर जाऊन लसीकरण करून घेण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांनाच जिथे लस उपलब्ध होत नाही, साठाच संपून जातो किंवा अनेकांना लस न मिळताच घरी जावे लागते. अशा परिस्थितीत गंभीर आजारी रुग्णांना लस देण्याचा निर्णय चांगला असला तरी त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सध्याच्या परिस्थितीत शक्य वाटत नाही.
मला लस कधी मिळणार
वयोमानामुळे माझी प्रकृती नाजूक झाली आहे. त्यामुळे मला बेडवरुन उठण्यासदेखील कष्ट पडतात. अशा परिस्थितीत मी रांगेत उभा राहून लस घेऊ शकत नसल्याने घरी येऊन कुणी लस दिली तरच लस घेता येणे शक्य आहे.
दत्तात्रय वडनेरे, नागरिक
मला गुडघ्याचा आजार असून, घरात पडले आहे. माझी नित्यकर्मदेखील मला करायला कष्ट पडतात. अशा परिस्थितीत मी लसीकरण केंद्रावर जाऊच शकत नाही. त्यामुळे घरपोच लस मिळाली तरच घेता येणार आहे.
खुर्शीद शेख, नागरिक
इन्फो
हायरिस्कमध्ये येणाऱ्यांना प्राधान्य
बेडरिडन रुग्णांबरोबरच कॅन्सर, एड्स, किडनी विकार तसेच जीवावर बेतणाऱ्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेले रुग्ण हे हायरिस्कमध्ये येतात. तसेच विविध कारणांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्कात येणाऱ्या महिला आणि पुरुष या हायरिस्क घटकात येत असल्याने त्यांनादेखील प्राधान्य क्रमाने लस देण्याची आवश्यकता आहे.
----------
शासनाकडून त्याबाबतचे आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ज्यावेळी आदेश प्राप्त होतील, तसेच घरपोच लस देण्यासाठी लस उपलब्ध करून दिल्यानंतर शासन आदेशानुसार प्राधान्य क्रमाने लस देता येईल. त्यासाठी स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे.
डॉ. कपिल आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी
---------------
ही डमी आहे.