वडझिरेच्या सरपंचपदी अंबादास बोडके बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 12:11 AM2018-03-11T00:11:24+5:302018-03-11T00:11:24+5:30
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंबादास बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
वडझिरे : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अंबादास बोडके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच संजय नागरे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून सुमारे दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा राजीनामा दिला होता. सरपंचपदाच्या निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एम. एन. गाडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंचपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव असल्याने या जागेसाठी अंबादास बोडके यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होता. या अर्जावर सूचक म्हणून संजय नागरे यांनी स्वाक्षरी केली होती. नऊ सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये एक सदस्य गैरहजर राहिले. सरपंचपदासाठी बोडके यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकाºयांनी केली. सुमारे अडीच वर्षांपूर्वी झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पॅनलचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते अर्जुन बोडके, भीमराव दराडे, वसंत बोडके, आर. बी. बोडके व विलास बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या सर्व जागा निवडून आणून ग्रामपंचायतीवर निर्विवाद बहुमत प्रस्थापित केले होते. अडीच वर्षांनंतर सरपंचपदात फेरबदल करून सहकारी सदस्यास संधी देण्यात आली. सरपंचपदी अंबादास बोडके यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या हस्ते हार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपसरपंच छाया नागरे, मावळते सरपंच संजय नागरे, ग्रामपंचायत सदस्य अलका बोडके, रेखा बोडके, शोभा बोडके, मंदा ठोंबरे, तुषार अांबेकर आदींसह ग्रामस्थ शिवाजी बोडके, विलास बोडके, फकीरा दराडे, तुकाराम शेळके उपस्थित होते.