वडनेरभैरव : जनता विद्यालयाच्या १९९१च्या माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम जुन्या वर्गमित्रांनी स्रेहमेळा केला यादगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 11:53 PM2018-02-03T23:53:14+5:302018-02-03T23:54:14+5:30
वडनेरभैरव : शाळेची घंटा वाजली अन् सगळेच विद्यार्थी रांगा करून उभे राहिले. एक साथ विश्राम झाल्यानंतर ‘खरा तो एकची धर्म..’ ही प्रार्थना म्हटली गेली.
वडनेरभैरव : शाळेची घंटा वाजली अन् सगळेच विद्यार्थी रांगा करून उभे राहिले. एक साथ विश्राम झाल्यानंतर ‘खरा तो एकची धर्म..’ ही प्रार्थना म्हटली गेली. त्यानंतर मनोभावे प्रार्थनाही झाली. दिवसभर वेगवेगळे खेळ खेळल्यानंतर तेरे जैसा यार कहा, कहा ऐसा याराना हे गाणे लावले गेले अन् आपसूकच साºयांचे डोळे पाणावले. वेळ झाली होती सर्वांचा निरोप घेण्याची. जनता विद्यालय वडनेरभैरव शाळेच्या सन १९९१च्या म्हणजेच पंचवीस वर्षांपूर्वीच्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे हे कवित्व ! हॉटेल गोविंदमध्ये झालेल्या या स्नेहसंमेलनाला शाळाच उभी करण्यात आली होती. जनता विद्यालयाची दगडी इमारत तिच्या पुढे विद्यार्थ्यांनी लावलेली रोपे, वर्ग आणि बाकडे, जुने फोटो यांसह जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सकाळी ११ वाजता स्नेहमेळ्याला सुरुवात करण्यात आली. प्रार्थना आटोपल्यानंतर प्रत्येकाने ओळख व आठवणी सांगितल्या. त्यावेळेस डोळ्यातून आपसूकच आठवणीचा बांध फुटला. यानंतर जे वर्गमित्र स्वर्गवासी झाले आहे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगीश्री. व सौ. मालपुरे, पगार, उशीर, तिडके, सातारकर आदी गुरुजनांनी विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. सातारकरसरांची वाटणारी आदरयुक्त भीती, तिडकेसरांच्या दहा छड्या, पुढे बसणाºया विद्यार्थ्यांच्या खोड्या, मागच्या बाकावरील विद्यार्थ्यांच्या खोड्या. एकमेकाच्या डब्यातील पदार्थ वाटून घेण्याची पद्धत या आठवणींना उजाळा देण्यात आला. महत्त्वाचे म्हणजे शाळेविषयी आणि शिक्षकाविषयी प्रत्येकाच्या मनात अजूनही आदर टिकून असल्याची भावना प्रामाणिकपणे व्यक्त केली. सायंकाळी सर्वांना निरोप देण्यापूर्वी समूह फोटो काढण्यात आले. या मेळाव्यासाठी पुणे, कल्याण, मुंबई व नाशिक जिल्ह्यातील सर्व मित्र मैत्रिणींनी सहभाग घेतला होता.