वडनेरभैरवला जोगेश्वरी नवरात्रोत्सवाची सांगता
By admin | Published: October 15, 2016 01:37 AM2016-10-15T01:37:20+5:302016-10-15T01:42:07+5:30
वडनेरभैरवला जोगेश्वरी नवरात्रोत्सवाची सांगता
वडनेरभैरव : येथील कुलदेवता जोगेश्वरीमातेचा (जोगशेलू) शारदीय नवरात्रोत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. हजारो भाविकांनी जोगेश्वरीमातेचे दर्शन घेतले. विजयादशमीला महाआरतीने नवरात्रोत्सवाची सांगता झाली. नाथउपदेशी सलादेबाबा यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जोगशेलू येथे कुलस्वामिनी जोगेश्वरीमाता व दत्त मंदिर बांधण्यात आले आहे. ज्यांना जोगेश्वरीमातेच्या मूळ स्थानाला भेट देता येत नाही ते वडनेरभैरवला या देवी मंदिराला नवरात्रोत्सव काळात सहपरिवार भेट देतात. नवरात्रोत्सवाची सुरुवात घटस्थापना करून होते. दररोज सकाळी आरती, देवी सप्तशप्ती पाठ, तर सायंकाळी निमंत्रितांची आरती व रात्री दंडिया होत असे. नवचंडी होम व कुमकुम अर्चन कार्यक्रम झाला. नवरात्रोत्सवाची सांगता कालभैरव देवस्थानचे सल्लागार पोपटराव पवार यांच्या हस्ते महाआरती होऊन झाली. यानिमित्ताने जोगेश्वरीमाता मंदिराला व परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोपटराव शेटे, भास्करराव रसाळ, सुरेश सलादे, योगेश कावळे, विष्णू जाधव, मार्गदर्शक श्रीराम शेटे, राजाराम पानगव्हाणे, शशिकांत जाधव यांनी परिश्रम घेतले. स्वागत विक्रम सलादे यांनी केले. नवरात्रीच्या काळात सुमारे वीस ते पंचवीस हजार भाविकांनी भेट दिली. (वार्ताहर)