दोन दिवस फरारी नाट्यानंतर वैशाली झनकर यांची शरणागती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:18 AM2021-08-14T04:18:41+5:302021-08-14T04:18:41+5:30

नाशिक : शैक्षणिक संस्थेचे अनुदान देण्याच्या मोबदल्यात लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तब्बल तीन दिवसांपासून फरार असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी ...

Vaishali Zankar surrenders after two days of Ferrari drama | दोन दिवस फरारी नाट्यानंतर वैशाली झनकर यांची शरणागती

दोन दिवस फरारी नाट्यानंतर वैशाली झनकर यांची शरणागती

Next

नाशिक : शैक्षणिक संस्थेचे अनुदान देण्याच्या मोबदल्यात लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी तब्बल तीन दिवसांपासून फरार असलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर या शुक्रवारी (दि. १३) नाट्यमयरीत्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिकच्या कार्यालयात हजर झाल्या. मात्र गंगापूररोड परिसरातून त्यांना अटक करण्यात आल्याचा दावा एसीबीने केला, मात्र नेमके कोठून अटक केली, याचा उलगडा होऊ शकला नाही. दरम्यान, झनकर यांनी न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मिळविण्याचे सर्व प्रयत्न करूनही कायदेशीर अडचणीत वाढ होत असल्याचे लक्षात आल्याने त्या स्वत:हून शरण आल्याची चर्चा होत आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर-वीर यांच्यासह त्यांचे साथीदार कारचालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना मंगळवारी (दि. १०) लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. परंतु, रात्री महिलेस अटक करण्यात तांत्रिक अडचणीचे कारण देत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वैशाली झनकर-वीर यांच्या नातलगांचे हमीपत्र घेत त्यांना घरी सोडले होते. मात्र त्यांनी दुसऱ्या दिवशी पोलीस ठाणे तसेच न्यायालयात हजर न होता तीन दिवस पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाल्या होत्या. तर त्यांच्या दोन साथीदारांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून, त्यांना शुक्रवार (दि. १३) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. दरम्यान, वैशाली झनकर-वीर यांनी गुरुवारी (दि. १२) अ‍ॅड. अविनाश भिडे यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. अटकपूर्व जामीन मिळण्याची शक्यता संपुष्टात आल्याने झनकर यांनी शुक्रवारी सकाळी गंगापूर येथील त्यांच्या नातलगाच्या बंगल्यात एसीबीसमोर येत शरणागती पत्करली. मात्र एसीबीकडून त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर प्रक्रियेनंतर न्यायालयात हजर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, न्यायालयात डॉ. वैशाली झनकर यांची बाजू मांडताना ॲड. अविनाश भिडे यांनी युक्तिवाद केला. यात झनकर यांनी प्रत्यक्ष लाचेची रक्कम स्वीकारली नसल्याचे नमूद करीत त्यांनी कोणत्याही प्रकारची मागणीही केली नसल्याचा दावा करीत त्यांची जामिनावर सुटका करण्याची मागणी केली. तर सरकारी पक्षाने झनकर यांच्या फरार होण्याचा मुद्दा उपस्थित करीत त्यांनी महिला म्हणून मिळालेल्या सलवतीचा गैरफायदा घेतल्याच न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्याकडे मिळून आलेल्या मालमत्तेची तसेच अन्य तांत्रिक बाबींच्या चौकशीसाठी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र न्यायालयाने दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर वैशाली झनकर-वीर यांना एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. तर त्यांचे साथीदार कार चालक ज्ञानेश्वर येवले व प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची न्यायायीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

130821\13nsk_28_13082021_13.jpg

दोन दिवस फरारी नाट्यानंतर वैशाली झनकर यांची शरणांगती 

Web Title: Vaishali Zankar surrenders after two days of Ferrari drama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.