वालदेवी नदीपात्र कोरडेठाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 12:19 AM2019-06-01T00:19:18+5:302019-06-01T00:19:41+5:30
वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीला पाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़
नाशिकरोड : वालदेवी नदीपात्र कोरडेठाक पडले असून परिसरातील गावांमधील जनावरांना पिण्यासाठी पाणी शिल्लक नाही़ त्यामुळे वालदेवी नदीलापाणी सोडावे अशाी मागणी पशुपालकांकडून होत आहे़ दरम्यान, नदीपात्रात नाले व गटारीचे पाणी मिसळत वाहत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरून डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नदीची स्वच्छता व पवित्र धोक्यात आले आहे.
वालदेवी धरणातून रोटेशन पाणी सोडण्यात येत असल्याने रोकडोबावाडी पुलापासून चेहेडी बंधाऱ्यापर्यंत नदीपात्र कोरडेठाक पडले आहे. नदी पात्राच्या मधोमध चारी खोदून ठेवली असून त्यामधून अत्यंत संथगतीने पाणी वाहत आहे. नदीपात्र कोरडेठाक पडल्याने मनपा प्रशासनाला नदीपात्र स्वच्छ करून दगडगोटे एका बाजूला व्यवस्थित लावणे शक्य आहे. मात्र नगरसेवक व प्रशासनाला नदीच्या स्वच्छता व पावित्र्याबाबत काही देणंघेणं नसल्यासारखी परिस्थिती आहे.
नाले-गटारीचे पाणी नदीत
रोकडोबावाडी डोबी मळा येथे आर्टिलरी सेंटरमधून येणारा नाला, जयभवानीरोड येथून येणारा सुंदरनगरमधील नाला, गटारी आदी ठिकाणचे दूषित पाणी सरळ सरळ वालदेवी नदीपात्रात येऊन मिसळत आहे. भूमिगत गटारीचे नदी पात्रातील काही चेंबर फुटल्याने तेथूनदेखील दूषित पाणी वाहून नदी पात्रात येत आहे, तर काही ठिकाणी पावसाळ्यात भूमिगत गटारीत
जास्त प्रमाणात पाणी आल्यावर ते चेंबरमधून नदीपात्रात मिसळते. नदीपात्राजवळ भूमिगत
गटारींचे पाइपलाइन-चेंबर एकमेकांना व्यवस्थित जोडण्यात न आल्याने नाले-गटारीमधून वाहून येणारे दूषित व घाणपाणी नदीपात्रात मिसळत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे.
परिसरातील रहिवासींंचे आरोग्य धोक्यात
नदी पात्रात येऊन मिसळणारे गटारी-नाले, भूमिगत गटारीचे अर्धवट काम यामुळे वालदेवीचे पवित्र व स्वच्छता धोक्यात आल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र कागदी घोडे नाचवले जात असल्याने नदीचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे परिसरातील रहिवासींंच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे.