वाल्मीक कराडने नाशिकमधील 'त्या' हस्तरेषा तज्ज्ञाला दाखवला हात?; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 14:56 IST2025-02-05T14:56:15+5:302025-02-05T14:56:32+5:30
या ज्योतिषाकडे राज्यातील अनेक बड्या नेत्यांची ऊठबस असून त्याच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय होत असल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर सुरू आहे.

वाल्मीक कराडने नाशिकमधील 'त्या' हस्तरेषा तज्ज्ञाला दाखवला हात?; चर्चांना उधाण
Walmik Karad: पवनचक्की खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातही नाव आल्याने मकोका अंतर्गत कारवाई झालेल्या वाल्मीक कराड याने नाशिकच्या एका हस्तरेषा तज्ज्ञाला हात दाखविल्याचा आरोप झाला आणि या हस्तरेषातज्ज्ञाच्या नावाची चर्चा राज्यभर सुरू झाली. या ज्योतिषाकडे राज्यातील अनेक बड्या नेत्यांची ऊठबस असून त्याच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय होत असल्याची चर्चाही समाजमाध्यमांवर सुरू आहे.
या ज्योतिषाचे वास्तव्य नाशिक शिर्डी महामार्गावरील एका मंदिरात असून त्याचे नाशिक शहरातही कार्यालय आहे. तो कॅप्टन या नावाने सर्वत्र ओळखला जातो. या ज्योतिषाकडे राज्यातील बडे राजकीय नेते येत जात असतात. त्यामध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार, आमदार, केंद्रीय मंत्री अशा अनेकांसह उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या महाराजांच्या सल्ल्यानेच अनेक निर्णय घेतले जात असल्याचे बोलले जाते.
दरम्यान, या ज्योतिषाच्या भेटीची आस अनेकांना लागून राहिली आहे. त्यामुळे त्यांच्या सल्ल्याने कोणाकोणाचा कसा लाभ झाला, याचीही चर्चा सुरू आहे.