वनविभागाचा ‘सर्पदोष’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 12:55 AM2017-07-27T00:55:39+5:302017-07-27T00:55:53+5:30

नाशिक : सर्प पकडणे, जवळ बाळगणे, त्याचा खेळ करणे, प्रदर्शन मांडणे हा वनकायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याने वनविभागाला संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत;

vanavaibhaagaacaa-sarapadaosa | वनविभागाचा ‘सर्पदोष’

वनविभागाचा ‘सर्पदोष’

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सर्प पकडणे, जवळ बाळगणे, त्याचा खेळ करणे, प्रदर्शन मांडणे हा वनकायद्यानुसार गुन्हा ठरत असल्याने वनविभागाला संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत; मात्र सर्प निघाल्यानंतर वनविभागाने प्रत्यक्षात काय करावे, याबाबतचे निश्चित धोरणच नसल्याने वनविभागात हा मोठा ‘सर्पदोष’ मानला जात आहे.  १९७२ च्या वनकायद्यानुसार सर्प संवर्धनाची जबाबदारी वनविभागाची आहे. त्यानुसार वनविभाग सर्प संवर्धनासाठी जनजागृती करीत असताना सर्प आढळल्यानंतर नागरिकांनी काय करावे याची माहिती मात्र देत नाही कारण सर्पविषयक तक्रारींचे निराकरण करण्याची कोणतीही यंत्रणाच वनविभागात नसल्याने वनविभाग विचारांच्या विळख्यात अडकले आहे.  घरात सर्प निघाल्यानंतर भेदरलेले कुटुंबीय तत्काळ सर्पमित्रांना पाचारण करतात. सर्पमित्रही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्प पकडतात; मात्र या सर्पमित्रांना वनविभागाची परवानगीच नसल्याने त्यांच्या लेखी तेही अनधिकृत आहेत. त्यामुळे सर्प पकडला म्हणून सर्पमित्रांवर वनविभागाची वक्रदृष्टी असते. दुसरीकडे वनविभागाकडे स्वत:चे असे सर्पमित्र नाहीत किंवा सर्प पकडण्याची यंत्रणा नाही. अशावेळी नागरिकांनाही दुसरा पर्याय उरत नाही. शिवाय एखाद्या नागरिकाने वनविभागाला दूरध्वनी करून सर्प निघाल्याची माहिती दिली तर वनविभागच सर्पमित्रांना बोलवा म्हणून उत्तर देतात. तेव्हा सर्पमित्र आणि नागरिकांनी करावे काय याबाबत मात्र वनविभाग मौन बाळगून आहे.
सन २००८ मध्ये सर्पमित्रांना वनविभागाने ओळखपत्र देऊन यंत्रणा उभारण्याचा प्रयत्न नाशिक वनविभागाने केला होता. परंतु सर्पमित्रांच्या अंतर्गत वादामुळे ही योजना केवळ एकच वर्ष टिकली आणि वनविभागानेही ओळखपत्रांचे नूतनीकरण केले नाही. त्यामुळे आजमितीस वनविभागाचे अधिकृत सर्पमित्र नाहीत हे स्पष्ट होते. सर्वसामान्यांचा संपर्क हा सर्पमित्रांशी येत असल्याने ते सर्पमित्रांना सर्प पकडण्यासाठी पाचारण करतात. परंतु वनविभागाला सर्पमित्रांकडे सर्प असल्याचे आढळून आले तर ते सर्पमित्रांवरही कारवाई करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. सर्पांपासून नागरिकांचे रक्षण करण्याचे कोणतेही धोरण वनखात्याकडे नसल्याने या साऱ्या प्रकारावरून दिसून येते. किंबहुना सर्प आढळल्यानंतर त्याची जबाबदारी वनविभागाची आहे की नाही, याचा कुठेही उलगडा होताना दिसत नाही.



रात्री पकडलेल्या सर्पाचे काय ?




अनेकांच्या घरात रात्री सर्प निघतो. रात्रीच्या सुमारास सर्पमित्र सर्प पकडतात. परंतु रात्रीच जंगलात जाऊन सर्प सोडणे शक्य नसल्याने सर्पमित्र हे स्वत:जवळच सर्प ठेवण्याचा धोका पत्करतात. सर्प रात्रभर जवळ का ठेवला म्हणून वनविभाग कारवाई करू शकतात असे माहिती असतानाही सर्पमित्र कारवाईचा धोका पत्करून मदतीला धावून जातात. रात्री पकडलेल्या सर्पाचे करायचे काय? याबाबत वनविभाग स्पष्ट भूमिका घेण्यास तयार नाही; मात्र सर्प डांबून ठेवला म्हणून वनकायद्याचा बडगा उगारतात.



सर्प कुणी पकडावा, कुठे सोडावा..
४सर्प आढळल्यानंतर वनविभागाला कळविण्यासाठीची कोणतीही यंत्रणा अस्तित्वात नाही. वास्तविक सर्प संवर्धनाची जबाबदारी असणाऱ्या वनविभागाने अशी यंत्रणा निर्माण करणे अपेक्षित आहे. परंतु आपले काहीएक देणेघेणे नसल्याचीच वनविभागाची कार्यपद्धती आहे. सर्प कुणी पकडावा, पकडलेला सर्प कुठे सोडावा, सर्प पकडणारे प्रशिक्षित आहेत का, त्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी कुणाची याबाबत वनविभागाला काही एक देणेघेणे नसल्याचे दिसते.

Web Title: vanavaibhaagaacaa-sarapadaosa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.