विंचूर-प्रकाशा महामार्ग दुरुस्तीचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2019 03:44 PM2019-09-06T15:44:14+5:302019-09-06T15:44:33+5:30
नागरिकांची तक्रार : खड्डयांमुळे वाहनचालक त्रस्त
देवळा : देवळा येथे विंचूर - प्रकाशा महामार्गावर पावसामुळे खड्डे पडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली संबंधित टोल कंपनीमार्फत रस्ता दुरूस्तीचे काम सुरू आहे. परंतु सदरचे काम करताना दर्जा राखला जात नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
भावडघाटात असलेल्या टोल कंपनीच्या अखत्यारीत विंचूर प्रकाशा महामार्ग येतो. देवळा शहरातून जाणाऱ्या ह्या मार्गावर देवळा पोलिस ठाणे,पाचकंदील, स्टेट बँक परीसरात रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहनचालकांना ह्या रस्त्याने जातांना कसरत करावी लागत असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. टोल कंपनीने ह्या रस्त्यावरील खड्डे दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. परंतु यासाठी वापरली जाणारी खडी व ग्रीट निकृष्ट दर्जाची व ओली असल्यामुळे त्यावर डांबर टाकल्यानंतर ती एकजीव होत नाही. शासकीय निकषानुसार सदर दुरूस्ती होत नसल्याने खडी लवकरच उखडून खड्डे परत ‘जैसे थे’ होणार आहेत. ह्या कामावर सार्वजनिक बांधकाम विभाग मालेगाव उपविभागाचे नियंत्रण व काम योग्य पद्धतीने करून घ्यावयाची जबाबदारी आहे. परंतु ह्या विभागाचा शाखा अभियंता इकडे फिरकलेला नाही.