‘स्पंदन - २०१७’ समित्यांची बैठक
By admin | Published: February 20, 2017 12:12 AM2017-02-20T00:12:21+5:302017-02-20T00:12:32+5:30
आरोग्य विज्ञान विद्यापीठ : नागपूर येथे युवा महोत्सव
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने ‘स्पंदन-२०१७’ या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन येत्या २ मार्चपासून करण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या आयोजनासाठी विविध समित्यांची बैठक नागपूर येथे प्रति-कुलगुरू डॉ. मोहन खामगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीसाठी नागपूर येथील विभागीय केंद्राच्या संचालक डॉ. मनीषा कोठेकर, अधिसभा सदस्य डॉ. समीर गोलावार, डॉ. स्वप्नील तोरणे, विद्यार्थी कल्याण विभागाचे बाळासाहेब पेंढारकर, राजेश पाटील, डॉ. जयश्री म्हैसेकर आदि उपस्थित होते. प्रति-कुलपती डॉ. मोहन खामगावकर यांनी सांगितले की, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित असलेले संपूर्ण राज्यातील वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथिक व तत्सम विद्याशाखांच्या महाविद्यालयांमधून या कार्यक्रमासाठी आजपर्यंत सुमारे १३००हून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. विद्यापीठाने विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाव मिळून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे या युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यासपीठ स्पंदनच्या निमित्ताने लाभणार आहे. या विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी सर्व समित्यांनी कार्य करावे, असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. संजय पाटील, डॉ. उषा रडके, डॉ. रसूल, डॉ. सपन जैन,
आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)