वणी-सापुतारा रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 05:13 PM2020-01-13T17:13:57+5:302020-01-13T17:14:10+5:30
दणका : व्यावसायिकांनी स्वत:हून दिला प्रतिसाद
वणी : सार्वजनिक बांधकाम विभागाने सोमवारी (दि.१३) राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत असलेल्या व रस्त्याचे काम सुरू असलेल्या परिसरात अतिक्र मण हटाव मोहीम राबविण्यापूर्वीच व्यावसायिकांनी स्वत:हूनच अतिक्रमण काढून घेणे पसंत केले.
वणी-पिंपळगाव तसेच वणी-सापुतारा रस्त्यावर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. राष्ट्रीय महामार्गावर सध्या काम सुरू असून रस्त्यात अडथळा ठरणारे अतिक्रमण हटविण्यासाठी सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी मनोज पाटील, सहाय्यक अभियंता एस. टी. बडगुजर, महेश पाटील, शाखा अभियंता खेडकर हे चार जेसीबी, पाच डंपर असा लवाजमा घेऊन पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले. यावेळी उपविभागीय अधिकारी सदाशिव वाघमारे यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण पाडवी, पोलिस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांनी मोठा पोलीस फौजफाटा आणला होता. मात्र, अतिक्र मण धारकांनी प्रशासनाच्या तयारी पाहताच स्वयंस्फूर्तीने अतिक्र मण काढून घेण्यास सुरुवात केली. व्यावसायिकांनी विरोध न करता आपले सामान काढून घेतले. दरम्यान जुन्या वणी कळवण रस्त्यावरील अडथळ्याबाबतही प्रशासनाने माहिती मागविली असून त्याबाबतीतही चौकशी करण्यात येणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मनोज पाटील यांनी दिली.