वनराई : सनई-चौघड्याच्या सूरात नाशिककरांनी साजरा केला वृक्षांचा ‘बर्थ-डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 04:54 PM2019-06-06T16:54:46+5:302019-06-06T16:57:31+5:30
पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले. -
नाशिक : ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ असे म्हणत शेकडो नाशिककरांचे हात हजारो झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यासाठी सरसावले. यावेळी सनई-चौघड्यांचा सूराने परिसर दुमदुमला. नाशिककरांनी म्हसरूळ येथील ‘वनराई’मध्ये जागतिक पर्यावरण दिनी मोठ्या संख्येने हजेरी लावून झाडांना खतपाणी घालून औक्षण केले तसेच जंगली झुडुपांच्या लागवडीसाठी योगदान दिले.
निमित्त होते, नाशिक पश्चिम वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेच्या वतीने आयोजित पाचवा वनमहोत्सव अन् वचनपूर्ती सोहळ्याचे. वनविभागाच्या आगारामधील मोकळ्या भूखंडावर तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून लावण्यात आलेल्या सहा हजार झाडांची दमदार वाढ बघून नाशिककर समाधानी झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वयंस्फूर्तीने पाण्याचे डबे, गांडूळ खत झाडांना वाढदिवसाचे ‘गिफ्ट’म्हणून दिले. नाशिककरांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांमध्ये वृक्ष चळवळीविषयी अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड व संगोपनाची आवड वाढावी या उद्देशाने आपलं पर्यावरण संस्था प्रयत्नशील आहे. शहरात ‘नाशिक देवराई’, ‘नाशिक वनराई’ हे दोन प्रकल्प साकारण्याचा सर्वप्रथम प्रयत्न या संस्थेकडून पाच वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. केवळ वृक्षारोपण न करता त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारून संस्थेचे स्वयंसेवक वर्षभर ‘पर्यावरण दिन’ साजरा करतात.
वनराईमधील दुर्मीळ प्रजातीच्या झाडांच्या सोबतीला आता दुर्मीळ जंगली झुडुपांची भर पडली आहे. वृक्षपूजा व औक्षणाप्रसंगी महापौर रंजना भानसी, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक शिवाजी फुले, वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, लेखक अरविंद जगताप, सभागृहनेता दिनकर पाटील, नगरसेवक रूची कुंभारकर, सतीश सोनवणे, दीपाली कुलकर्णी, गायक संजय गिते, संस्थेचे अध्यक्ष शेखर गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
-
नाशिककरांचे सयाजी शिंदेंकडून कौतुक
वनमहोत्सवांतर्गत वनराईमध्ये झुडुपांच्या २७ प्रजातींची पाचशे रोपे लावण्यात आली. नागरिकांनीदेखील येताना सोबत एक-एक रोपटे आणल्याने दिवसभरात साडेतीनशे रोपांचीही लागवड झाली. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आबालवृद्ध नाशिककरांचा सळसळता उत्साह अन् वृक्षप्रेम बघून ‘सह्याद्री देवराई’फेम अभिनेता सयाजी शिंदेदेखील हरखून गेले. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नाशिककरांची जणू जत्राच भरली आहे, या शब्दांत शिंदे यांनी कौतुक केले.
-
लावलेली वृक्ष वाऱ्यावर सोडून देणे हा या संस्थेचा मुळीच उद्देश नाही. भारतीय प्रजातीच्या झाडंझुडुपांच्या लागवडीमागे जैवविविधतेची जोपासना हा मूळ हेतू आहे. त्या दृष्टीने नाशिक देवराई, वनराईमध्ये रोपांची लागवड आणि संगोपनावर संस्थेकडून भर दिला जात आहे.
- शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी