वरसविहीर ग्रामस्थ पितात जंतुमिश्रित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 06:28 PM2020-05-20T18:28:09+5:302020-05-20T18:28:16+5:30
दुषित विहीर : ग्रामपंचायतीचा रामभरोसे कारभार
वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वरसविहीर गावात पिण्याच्या पाण्याचा बाका प्रसंग उभा ठाकला असून गावाला पाणी पुरवठा करणाऱ्यात विहिरीत जंतु आढळून आल्याने ग्रामस्थांबरोबरच प्रशासनाचेही धाबे दणाणले आहे. अधिकाऱ्यांनी गावाकडे धाव घेत विहिरीची पाहणी केली असता, पाण्यात मोठ्या प्रमाणावर जंतू आढळून आल्याने पाणी पिण्यास अयोग्य बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या रामभरोसे कारभारावर बोट ठेवले आहे.
गावाला पाणीपुरवठा करणाºया विहीरीतील पाण्यात जंतु आढळून आल्याचे कळताच होताच जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विनायक माळेकर ,सभापती मोतीराम दिवे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.योगेश मोरे, विस्तार अधिकारी राजेंद्र पाटील यांच्यासह गावाकडे धाव घेत विहीरीची पाहणी केली. यावेळी लोकप्रतिनिधींनी ग्रामसेवक डि.जे साबळे यांना धारेवर धरले. विहिरीकडे पूर्णत: दुर्लक्ष झाल्यानेही जाब विचारण्यात आला परंतु, गेल्या दोन वर्षांत चार ग्रामसेवक बदलून गेले असतांना सध्या स्थितीत काम करत असलेल्या ग्रामसेवकांना संपुर्ण चार्ज दिला गेलेलाच नसल्याचे समोर आले. त्यात चौदावा वित्त आयोग व पेसा निधीतून लाखो रूपये खर्च करुनही गावात कामे अपुर्ण असतांना ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्याच कशा, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला. दरम्यान, लोकप्रतिनिधींनी ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली असता, कार्यालयातील महापुरुषांचे फोटो एका कपाटात ठेवून दिल्याचे निदर्शनास आल्यानेही सभापती मोतीराम दिवे यांनी संबंधितांची कानउघाडणी केली.