गुढीपाडव्यानिमित्त मंडळांतर्फे विविध सांस्कृतिक उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:56 AM2018-03-20T00:56:57+5:302018-03-20T00:56:57+5:30
शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमध्येही गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला.
पंचवटी : शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच शाळांमध्येही गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. दिंडोरीरोडवरील गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या समारोपप्रसंगी संपूर्ण गोरक्षनगर रहिवासीयांनी रस्ता सुरक्षेचे नियम पाळण्याची, झाडांचे, पर्यावरणाचे संरक्षण करण्याची व परिसर स्वछ राखण्याची प्रतिज्ञा घेतली. गोरक्षनगरला नववर्षाच्या स्वागतासाठी गुढी उभारण्यात आली होती. सकाळी परिसरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शिवसंस्कृती ढोल पथकाचे ढोलवादक सहभागी झाले होते. ढोलताशे तसेच झांजरीच्या गजराने परिसर दुमदुमला होता. शोभायात्रेत थोर समाजसुधारक, विचारवंत, राम, सीता, शिवाजी महाराज, खंडेराव महाराज यांच्या वेशभूषा करून लहान मुले सहभागी झाली होती. या मुलांच्या हातातील भगवे ध्वज व प्रबोधनपर फलक लक्ष वेधून घेत होते. या उपक्र मात गोरक्षनगर, मेरी म्हसरूळ भागातील नागरिक सहभागी झाले होते. प्रमुख म्हणून आमदार बाळासाहेब सानप, प्रमोद जाधव, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, म्हसरूळचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी गोरक्षनगर ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते अस्मिता दुधारे, ज्योती वाकचौरे यांचा उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. नववर्ष निमित्ताने नारीशक्तीचा सन्मान म्हणून लकी ड्रॉद्वारे महिलांचा पैठणी साडी देऊन सत्कार करण्यात आला.
अनेक दीपांनी उजळला नंदिनीकाठ
सिडको : मराठी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने नंदिनी नदीचे आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व वाढविण्याच्या दृष्टिकोनातून नंदिनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पाच हजार पणती लावण्यात आल्या व प्रती समर्थ रामदास स्वामी यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी नंदिनीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प करण्यात आला. उंटवाडी येथील म्हसोबा मंदिर येथे रविवारी सायंकाळी गोदा संवर्धन मोहिमेचे मुख्य प्रवर्तक अमित कुलकर्णी व टीमच्या वतीने दीपोत्सव व महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. नंदिनीला पुनर्जीवन प्राप्त व्हावे यासाठी मोहिमेत विविध संघटना व युवकांनी सहभाग नोंदविला. आमदार देवयानी फरांदे, सोनलराजे पवार, महेश कडूस, नगरसेवक प्रियंका घाटे, श्यामकुमार साबळे, भाग्यश्री ढोमसे, हर्षदा गायकर, किशोर घाटे, रोशन घाटे, शिवाजी बरके, भाजपा मनोज बिरार, संदीप गायकर, किरण शिंदे, निशिकांत पगारे, उदय थोरात, योगेश गांगुर्डे, मनोज सावंत, बाळासाहेब मथुरे, सोमनाथ मुठाळ, योगेश बर्वे, प्रकाश बर्वे, अनुजा कुलकर्णी, कुलकर्णी सर, शिल्पा डहाके यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.