महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम : देवस्थानतर्फेजय्यत तयारी त्र्यंबकला दर्शन नियोजनात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 12:46 AM2018-02-09T00:46:16+5:302018-02-09T00:47:09+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्री असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस (दि. ११, १२ व १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर : येत्या मंगळवारी (दि. १३) महाशिवरात्री असल्याने त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. सलग तीन दिवस (दि. ११, १२ व १३) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर देणगी दर्शनाचे व रांगेतून दर्शनाचे खास वेगळे नियोजन फक्त महाशिवरात्री या एका दिवसापुरते करण्यात आले आहे. त्यानंतर नेहमीच्या नियोजनाप्रमाणे दर्शन सुरू राहणार आहे. श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे ज्योतिर्लिंग भगवान शंकराचे स्थान असून, महाशिवरात्रीनिमित्ताने सतत तीन दिवस दररोज रात्री सप्त धान्याने पूजा, मंदिर प्रांगणात पालखी मिरवणूक काढून रात्रीची पूजा करण्यात येते. तसेच बाळासाहेब चांदवडकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. महाशिवरात्रीनिमित्त रवींद्र अग्निहोत्री यांचे कीर्तन होणार आहे. या दिवशी भगवान शंकराला आवडत असलेले बिल्वपत्र मंदिराबाहेरील फुले विर्केत्यांकडे मिळतात. बिल्वफळ, कवठ, उसाचा रस आदी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली असते. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. उत्साह ओसंडून वाहत असतो. यात्रेला देशभरातून लाखो शिवभक्त येत असतात, तर राज्यातूनदेखील हजारो शिवभक्त येतात. कारण जेथे शंकराचे मंदिर असते तेथे महाशिवरात्रीला दर्शन घेता येते. दरम्यान, महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे गर्दीचा विचार करता पहाटे मंदिर उघडल्यापासून ते रात्री मंदिर बंद होईपर्यंत धर्मदर्शन मंदिराच्या पूर्व दरवाजाने २४ तास रांगेतून घेता येईल. स्थानिक भाविकांना दर्शन पहाटे मंदिर उघडल्यापासून दुपारी १२.३० पर्यंत, तर सायंकाळी ६ वाजेपासून दि. बुधवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत व सायंकाळी सहा ते मंदिर बंद होईपर्यंत पश्चिम दरवाजातून प्रवेश दिला जाईल. मात्र स्थानिक भाविकांनी आपल्याजवळ ओळखपत्र आणणे गरजेचे आहे. तसेच पुरोहितांच्या यजमानांना धार्मिक कार्यक्रमासाठी पश्चिम दरवाजाने पहाटेपासून दुपारी १२.३० पर्यंत अभिषेक पावती फाडून प्रवेश दिला जाईल. सभामंडपातील जाळीच्या आतून रांगेतून यजमानांना दर्शन घेता येईल तोपर्यंत पुरोहितांनी मंदिर प्रांगणात मंडपातच धार्मिक विधी करावेत. स्थानिक व बाहेरगावच्या भाविकांनी बाहेर जाण्याकरिता दक्षिण दरवाजाचाच वापर करावा. तसेच दक्षिण दरवाजापासून मंदिरात प्रवेश करण्यास सक्त मनाई आहे.