सिन्नरला पोषण अभियानानिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 10:13 PM2019-09-08T22:13:16+5:302019-09-08T22:15:24+5:30
सिन्नर : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात शासनाच्या पोषण अभियानास सुरुवात करण्यात आली. शहर व परिसरात एक महिना हे अभियान सुरू राहणार आहे.
सिन्नर : कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी शहरात शासनाच्या पोषण अभियानास सुरुवात करण्यात आली. शहर व परिसरात एक महिना हे अभियान सुरू राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सप्टेंबर २०१८ पासून पोषण अभियान यशस्वीरीत्या राबविले जात आहे. त्यामुळे राज्यातील कुपोषणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी पोषण अभियान राबविले जात असून, सप्टेंबर २०१९ हा पोषण माह म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. इंदिरानगर येथील अंगणवाडी येथे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या (नागरी) मुख्य सेविका मीलन गिते, शहर अभियान व्यवस्थापक अनिल जाधव, आरोग्यसेविका संगीता शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पोषण माहनिमित्त जनजागृतीपर बैठक पार पडली.
आपले मूल सुदृढ व आरोग्यदायी राहावे यासाठी प्रत्येक मातेने आहारात मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, फळे यांचे प्रमाण वाढवावे, असे मीलन गिते यांनी सांगितले.
लहान मुलांच्या आहाराकडे प्रत्येक पालकांनी बारकाईने लक्ष द्यावे, त्यांच्या आवडीनुसार विविध खाद्यपदार्थ घरीच तयार करून द्यावेत. दुकानातील कृत्रिम खाद्यपदार्थ लहान मुलांना देऊ नयेत. जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे खूप आवश्यक आहे. हात स्वच्छ न धुतल्याने लहान मुलांत आजारपणाचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणे खूप महत्त्वाचे आहे. ज्यामुळे आपल्या कुटुंबातील आरोग्यावर होणारा खर्च निश्चितच कमी
होतो, असे अनिल जाधव यांनी सांगितले.
यावेळी अनुराधा लोंढे, अंगणवाडी सेविका ललिता लोंढे, गायत्री जगझाप, हिराबाई लोणारे, ज्योती दुबे, सुनीता गोळेसर, हेमलता मिठे, रूपाली जाधव, लता रायते, मदतनीस सविता कुरणे, सुजाता देशमुख, शीला वरंदळ, प्रियांका लोणारे, नीती जाधव, ज्योती लहामगे यांच्यासह महिला व बालके मोठ्या संख्येने उपस्थित होते.