आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:21 AM2018-07-24T00:21:39+5:302018-07-24T00:21:54+5:30
आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत बालवारकऱ्यांनी दिंडी काढली. यावेळी या मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेशदेखील दिला.
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त शहरातील विविध शाळांमध्ये ज्ञानोबा-तुकारामाचा गजर करीत बालवारकऱ्यांनी दिंडी काढली. यावेळी या मुलांनी पर्यावरण रक्षणाचा संदेशदेखील दिला. छत्रपती शिवाजी विद्यालय, शिंदे येथील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढून आषाढी एकादशी साजरी केली. प्राचार्य पुरुषोत्तम रकि बे यांनी दिंडी सोहळ्याला प्रारंभ केला. यावेळी विद्यार्थ्यांनी आकर्षक वेशभूषा करून अभंग व वृक्षसंवर्धन गीते सादर केली. यावेळी कैलास टिळे, विजय टिळे, संजय इंदरखे, नाना सरोदे, बाळू टिळे, एन. वाय. पगार आदी उपस्थित होते. संजीवनी विद्यामंदिर : नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आषाढी एकादशीनिमित्त दिंडी काढण्यात आली. प्रारंभी मुख्याध्यापिका माया गोसावी यांच्या हस्ते दिंडीची विधिवत पूजा करण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून गीता कुलकर्णी, रूपाली राठोड, सीमा देशपांडे उपस्थित होत्या. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिणी, वारकरी, संत यांची वेशभूषा केली होती. या वेशभूषेत स्वराली सांगळे, गौरी नवले, राशी शेळके या विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावले. यावेळी आषाढी एकादशीचे महत्त्व गीता कुलकर्णी यांनी सांगितले. स्वागत कावेरी राऊत यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा भोये यांनी केले. आभार समाधान आव्हाड यांनी मानले. कार्यक्रमास सुनंदा नागपुरे, सतीश गोरडे, हिरा गारे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
युनिव्हर्सल अकॅडमी: युनिव्हर्सल अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, पंचवटी येथे आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे अध्यक्ष अर्जुन टिळे, सचिव प्रा. वैशाली टिळे आणि मुख्याध्यापक शैला सांगळे हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थी वारकरी व संतांच्या पोषाखात आनंदाने सहभागी झाले. काही बालगोपाळांनी विठ्ठल-रुख्मिणीच्या वेशात हजेरी लावली. कार्यक्रमात सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक कोमल सांगळे यांनी केले.
न्यू इरा शाळा: न्यू इरा शाळेत टाळ-मृदंगाच्या गजरात आणि हरिनामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक राजेंद्र महाले, कल्पना चुंभळे आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी प्लॅस्टिकबंदीचे घोषवाक्य असलेले फलक हातात घेतले होते. यावेळी स्तोत्र पठण स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
सरस्वती गुलाबराव पाटील विद्यालय : आषाढी एकादशीनिमित्ताचे औचित्य साधत विद्यालयात प्लॅस्टिकमुक्ती जागृती अभियान दिंडी काढण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अण्णा पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक सुनील बिरारी, माध्यमिकचे मुख्याध्यापक मनोज वाकचौरे उपस्थित होते.
जाजू विद्यालय : राणेनगर येथील रामनाथशेठ जाजू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली होती. याप्रसंगी शाळेच्या सहचिटणीस चंद्रावती नरगुंदे, मुख्याध्यापक संगीता गजभिये, अजय पवार, हेमंत गायकवाड, अनिल धोंगडे, वाल्मीक अभंग, संतोष शिंदे, रामदास चौरे, सुरेश काळे आदी उपस्थित होते. के. के. वाघ शाळा, सरस्वतीनगर येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी दिंडी सोहळा आयोजित केला होता. यावेळी मुख्याध्यापिका अश्विनी पवार यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी माधुरी निफाडे, सुचेता विसपुते, अरुणा सोनवणे, संगीता वांजुळे यांनी मार्गदर्शन केले.