पर्जन्याभिषेकात फुलला वैष्णवमेळा !
By admin | Published: September 18, 2015 10:52 PM2015-09-18T22:52:37+5:302015-09-18T22:59:11+5:30
कुंभपर्व : अखेरच्या पर्वणीला नाशिकच्या रामकुंडात स्नानासाठी लोटला अथांग भक्तिसागर
नाशिक : पहाटेपासून अखंड कोसळणाऱ्या धुवाधार पावसाच्या साक्षीने विकार-अवगुणांचे दमन करीत निर्मळतेची चैतन्यदायी अनुभूती घेण्यासाठी अवघ्या वैष्णव साधू-महंतांनी आपले देह गोदेच्या खळाळत्या प्रवाहात झोकून दिले आणि शाहीस्नानाच्या या पवित्र, विस्मयकारी प्रत्ययाने गोदाकाठही जणू थरारून निघाला... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नाशिकमधील तिसऱ्या व अखेरच्या पर्वणीला देशभरातून आलेल्या लाखो श्रद्धाळूंनीही पाऊसधारा अंगावर झेलत रामकुंडात डुबकी मारून आयुष्याचे सार्थक केले. पर्जन्याभिषेकात रंगलेल्या या पर्वणीबरोबरच नाशिकमधील यंदाच्या कुंभमेळ्याचा अध्याय सुफळ संपूर्ण झाला.
कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीला विक्रमी भाविकांनी हजेरी लावल्यानंतर आजच्या तिसऱ्या पर्वणीकडे देशाचे लक्ष होते. गुरुवारीच लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ऋषिपंचमीच्या मुहूर्तावर आलेल्या या पर्वणीला भाविकांचा किती प्रतिसाद लाभतो, (पान ५ वर)
याकडे सर्वांच्याच नजरा लागून होत्या; मात्र ही पर्वणी साधू-महंत आणि भाविकांपेक्षाही पावसानेच अधिक गाजवली. शुक्रवारी पहाटे तीन वाजेपासूनच नाशिक शहरात मुसळधार पावसाला प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत संततधार सुरूच असल्याने साधू-महंतांची शाही मिरवणूक, शाहीस्नान व भाविकांचे स्नान पावसातच पार पडले; मात्र त्यामुळे भाविकांच्या उत्साहात तसूभरही उणेपणा आला नव्हता.
सर्वांचेच प्रमुख आकर्षण असलेली साधू-महंतांची मिरवणूक सकाळी सहा वाजता तपोवनातील साधुग्रामच्या लक्ष्मीनारायण मंदिरापासून निघाली. आखाड्याचे ध्वज, निशाण नाचवत, इष्टदेवतांचा मान सांभाळत साधूंनी रामकुंडाच्या दिशेने प्रयाण केले. गेल्या वेळेप्रमाणेच यंदाही मिरवणुकीच्या अग्रभागी निर्मोही आखाडा होता. त्यानंतर दिगंबर व अखेरीस निर्वाणी आखाडा मिरवणुकीत सहभागी झाला होता. ‘जय श्रीराम’, ‘सियावर रामचंद्र की जय’चा अखंड जयघोष करीत, मर्दानी खेळांचे दर्शन घडवत, बॅण्डपथकाच्या तालावर साधूंचे आखाडे गोदाघाटावर दाखल होत होते.
दरम्यान, परंपरेनुसार आज निर्वाणी आखाड्याच्या महंतांचा स्नानाचा प्रथम मान असल्याने निर्मोही व दिगंबर आखाड्याचे प्रमुख महंत गोदाघाटावर पोहोचूनही ध्वज, निशाणांसह भाजीबाजार पटांगणावरच थांबून राहिले. यावेळी त्यांच्या खालशांची स्नाने मात्र सुरू ठेवण्यात आली. सकाळी ७ वाजून ७ मिनिटांनी निर्मोही आखाड्याचे खालसे रामकुंडात स्नानासाठी उतरले. सकाळी ७ वाजून ४५ मिनिटांनी दिगंबर आखाड्याच्या खालशांनी स्नान सुरू केले. ८ वाजून ४५ मिनिटांनी निर्वाणी आखाडा गोदाघाटावर पोहोचला. ध्वज, निशाण व इष्टदेवतांचे विधिवत पूजन झाल्यानंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष तथा निर्वाणी आखाड्याचे श्री महंत ग्यानदास, श्री महंत धरमदास, चतु:संप्रदायाचे श्री महंत फुलडोल बिहारीदास, महंत रासबिहारीदास, श्री पंच हरिव्यासी खाकी आखाड्याचे महंत जगन्नाथ संतदास, राधेश्यामदास, जगद्गुरू निम्बार्कचार्य अजमेरद्वारा श्री जी महाराज यांच्यासह महंतांनी स्नान केले. यावेळी श्री महंत ग्यानदास यांनी भाविकांना हात उंचावून अभिवादन करताच भाविकांची एकच जल्लोष केला. यानंतर दिगंबर आखाड्याचे श्री महंत कृष्णदास, श्री रामकिशोरदास शास्त्री, चतु:संप्रदायाचे महंत बर्फानीदादा महाराज, महंत वैष्णवदास, महंत भक्तिचरणदास व त्यांच्यानंतर निर्मोही आखाड्याचे श्री महंत अयोध्यादास, श्री महंत राजेंद्रदास, चतु:संप्रदायाचे रामलखनदास, सुरतच्या षष्ठपीठाचे जगद्गुरू वल्लभाचार्य स्वामी वल्लभराय महाराज, स्वामी अनुरागराय महाराज यांनी पवित्र गोदास्नान केले. यावेळी साधू-महंतांनी आपल्या जटांचे प्रदर्शन करीत भाविकांचे लक्ष वेधून घेतले. दरम्यान, यानंतर निर्वाणी, दिगंबर व निर्मोही या क्रमाने आखाडे साधुग्रामकडे परतले.
जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, महापौर अशोक मुर्तडक, श्री गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी साधू-महंतांचे स्वागत केले. मनसेचे आमदार बाळा नांदगावकर उपस्थित होते. दिनेश गायधनी, विनायक गायधनी, गजानन गायधनी आदि ब्रह्मवृंदांनी आखाड्यांच्या इष्टदेवता पूजाविधीचे पौरोहित्य केले. सकाळी साडेनऊ वाजताच तिन्ही आखाड्यांचे शाहीस्नान आटोपल्याने प्रशासनावरचा ताण हलका झाला. त्यानंतर गर्दीचा अंदाज घेऊन भाविकांच्या स्नानासाठी रामकुंड खुले करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत गोदाघाट भाविकांनी गजबजून गेला होता. दरम्यान, याबरोबरच नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पर्वण्या संपुष्टात आल्या असून, आता त्र्यंबकेश्वर येथे येत्या शुक्रवारी (दि. २५) शैव साधूंचे अखेरचे शाहीस्नान होणार आहे.
पावसाने गाजवली पर्वणी
पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती. पावसामुळे पहाटे पाचच्या सुमारासही रामकुंड परिसरात शुकशुकाट होता. संततधार पावसामुळे गोदेच्या पातळीत सतत वाढ होत असल्याने भाविकांना गोदापात्रात न जाण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून रामकुंडावर लाइफबोट, जॅकेटस् सज्ज ठेवले होते. पावसामुळे मिरवणुकीला उशीर होण्याचीही शक्यता वर्तवली जात होती; मात्र सुदैवाने मिरवणुकीवर पावसाचा परिणाम झाला नाही. पावसाचा जोर जरा कमी झाल्यावर भाविकांनीही स्नानासाठी गर्दी केली. दरम्यान, गणरायापाठोपाठ पावसानेही जोरदार पुनरागमन केल्याने तिसरी पर्वणी पावल्याची भावना नाशिककरांत व्यक्त होत होती.