पुराच्या वेढ्यात जन्मली 'वर्षा'; आपत्कालीन परिस्थिती महिला प्रसुती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 03:46 PM2019-08-06T15:46:33+5:302019-08-06T15:47:33+5:30
गावात भयाण काळोख पसरला होता प्रत्येक व्यक्ती आपला जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जात होते, अशा भयाण प्रसंगात...
सायखेडा (नाशिक)- गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला , गावात येणारे सर्व रस्ते बंद झाले,प्रत्येक गल्लीत पाणी घुसले, वीज पुरवठा खंडित झाला होता, गावात भयाण काळोख पसरला होता प्रत्येक व्यक्ती आपला जीव मुठीत धरून मिळेल त्या ठिकाणी सुरक्षित स्थळी जात होते , गावातील सामाजिक कार्यकर्ते सर्वोत्तपरीने मदत करत होते अशा भयाण प्रसंगात चांदोरी येथे ऊस तोडणी करण्यासाठी आलेल्या गीताच्या पोटात कळा यायला लागल्या. पोटात दुखायला लागले, मंगल कार्यालयात सुरक्षित स्थळी असूनही चहुबाजूनी पाणी आणि शेकडो लोक एकाच ठिकाणी असल्याने मोठी अडचण निर्माण झाली यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर आहेर, माजी सरपंच दत्ता गडाख यांनी तात्काळ तहसीलदार दीपक पाटील आणि प्रांत अर्चना पठारे यांना दुरध्वनी मार्फत कळविले प्रांत अर्चना पठारे तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र पुढची कोणतीही कार्यवाही अथवा गाडी पाण्यातून घेऊन जाण्याची परिस्थिती गीताची नसल्याने आणि सरकारी दवाखान्याला चारही बाजूंनी पुराच्या पाण्याचा वेढा असल्याने नेणार कुठे आणि असा प्रश्न निर्माण झाला गावातील येथील डॉ अर्चना कोरडे यांना तात्काळ पाचारण करण्यात आले सायंकाळचे आठ वाजता बाहेर धो धो पाऊस कोसळत असतांना गीताने एका गोंडस मुलीला जन्म दिला सदर माहिती जिल्हाधिकारी डॉ सूरज मांढरे यांना दूरध्वनीवरून कळविण्यात आली मुलगी जन्माला आली आणि बाहेर पाऊस पडत आहे, मुलीचे नाव वर्षा ठेव्हावे असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले यावेळी प्रसंगावधान राखत आपले कसब पणाला लावणारे सागर आहेर आणि दत्ता गडाख यांचे कौतुक केले.
पुराचा वेढा, धो धो पाऊस, वीज पुरवठा खंडित, कोणतीही साधन सामुग्री उपलब्द नाही अशा प्रतिकूल परिस्थिती मध्ये सदर प्रसुती करण्यात आली सध्या बाळ व बाळंतीण दोघेही सुखरूप आहे.बाळाचे वजन 3किलो 400 ग्रँम आहे
-डॉ अर्चना कोरडे, चांदोरी