भोजापूर खोरे परिसरात वरुणराजा रुसलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 03:20 PM2020-08-06T15:20:21+5:302020-08-06T15:20:44+5:30
नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा ...
नांदूरशिंगोटे : पावसाचे माहेरघर असलेल्या सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरात अद्यापही वरुणराजा रुसलेलाच आहे. पावसाळा सुरू होवून दोन महिन्याचा कालावधी उलाटला तरीही बंधारे कोरडेठाक आहे. त्यामुळे या परिसरातील शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
भोजापूर खोरे परिसरात जुन महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणी केली आहे. प्रामुख्याने चास, नळवाडी, कासारवाडी, सोनेवाडी हा भाग तालुक्यातील बागायती परिसर म्हणून ओळखला जातो. दरवर्षी या भागात पावसाचे प्रमाण चांगल्या प्रमाणात असते. यावर्षी शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. तसेच या भागातच भोजापूर धरण असल्याने नेहमीच हिरवीगार शेती पाहयाला मिळते. यावर्षी धरणात पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झालेला नाही. आजमितीस धरणात 40 टक्के पाणी साठा आहेत. भोजापूर धरणाच्या खाली असलेले तसेच म्हाळुंगी नदीवर असलेले केटीवेअर, बंधारे कोरडेठाक आहेत. पिकांची लागवड केल्यानंतर दीड ते दोन महिन्यापासून या भागात पावसाने पाठ फिरवल्याने पिके धोक्यात आली आहे. समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. भोजापूर खोरे परिसरातील चास येथील ठरावीक भागातच पावसाने हजेरी लावली असून उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे बळीराजा दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे.