वरूणराजाच्या कृपेने बहरला ‘साग’
By admin | Published: September 10, 2014 09:49 PM2014-09-10T21:49:07+5:302014-09-13T00:56:42+5:30
वरूणराजाच्या कृपेने बहरला ‘साग’
नाशिक, दि. १० - ‘साग’ नुसता शब्द जरी कानावर पडला तर तत्काळ आठवते दिर्घकाळ टिकणारे लाकूड. जुन्या वाड्यांमध्ये तसेच लाकडी फर्निचर तयार करण्यासाठी प्राधान्याने सागवानी लाकडाचा उपयोग केला जात होता. असा टिकाऊ व भव्य वाढणारा देखणा घनदाट सागाचा वृक्ष सध्या चांगलाच बहरला असल्याचे पहावयास मिळत आहे. शहरासह उपनगरीय भागांमध्ये सागाचे काही वृक्ष आजही पहावयास मिळतात. सागाचा वृक्ष हा मोठा विस्तार असलेल्या वृक्षांमध्ये गणला जातो. आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यात साग फुलायला लागतो. जवळपास आंब्याच्या मोहोरप्रमाणे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या फु लोऱ्याने सागाचे वृक्षाचे सौंदर्र्य सध्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. अस्सल भारतीय प्रजातीमधील हा अतिमहत्वाचा पर्यावरणपुरक वृक्ष आहे. सागाची पाने मोठ्या आकाराची असल्यामुळे या वृक्षाची घनदाट सावली पडते. शहरातील पंडीत जवाहरलाल नेहरू या शासकिय वन उद्यानात सागाची झाडे पहावयास मिळतात. साग वृक्षाच्या बीयांपासून तेल काढले जाते व ते कृमीनाशक म्हणून वापरले जाते.पावसाळ्यामध्ये सागाच्या वृक्ष हा अत्यंत सौंदर्यवान दिसतो. सागाचा वृक्ष हा मोठा विस्तार होणारा वृक्ष आहे. साग हा देशी वृक्ष असून महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पवर्तरांगेच्या परिसरात हा वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतो. सागवानी लाकू ड दिर्घकाळापर्यंत टिकणारे लाकूड म्हणून प्रसिध्द आहे. सागाचे वैशिष्ट म्हणजे या लाकडाला सुगंध असून हा वृक्ष दिसायला देखील सुंदर व भव्य असा आहे. सागाचे शास्त्रीय नाव टेक्टोना ग्रॅँडिस असे आहे. वनक्षेत्राखाली जमीन आणण्यासाठी साग हा उत्तम वृक्ष आहे. सागाच्या झाडाला पावसाळ्यानंतर येणारी फळे जेव्हा वाळतात व गळून जमिनीवर पडतात तेव्हा त्या फळांमधील बियांचा प्रसार होऊन रोपनिर्मीती होते. सागाचा वृक्ष पंचवीस ते तीस मीटर व त्यापेक्षाही अधिक उंच वाढतो. या वृक्षाचा बुंधा साधारणत: दीड किंवा दोन मीटरपर्यंत होतो. खोडाची व फांद्यांची साल तपकिरी व करड्या रंगाची दिसते. हिवाळ्यात या वृक्षाची पानगळ होते. सागाच्या बीयांचा औषधी वापर केला जातो. बीयां भीजून ठेवत त्याचे पाणी पिल्याने लघवी साफ होेते. पालवी फुटल्यानंतर सागाच्या कोवळ्या पानांची भाजीदेखील केली जाते. महाराष्ट्रात विदर्भमध्ये साग मोठ्या प्रमाणात आढळतो. तसेच नाशिक जिल्ह्यात पेठ, सुरगाना, हरसुल या भागात आढळतो. पाण्याचा निचरा होणारा जमिनीत हे झाड चांगल्या प्रकारे वाढते. सुरूवातीला मंद गतीने सागाच्या वृक्षाची वाढ होते.सागाचा वृक्ष हा पर्यावरणपुरक व जैवविविधतेची जोपासना करणारा वृक्ष म्हणून ओळखला जातोे. या वृक्षाला पावसाळ्यात आलेल्या फुलोऱ्याकडे मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. या वृक्षांच्या पानांच्या पाठीमागे कोळी हा किटक पोसला जातो. कोळी किटकाची उत्पत्ती देखील मोठ्या प्रमाणात होते. सनबर्ड हा कोळी किटक खाण्यासाठी आवजूर्न सागाच्या वृक्षावर हजेरी लावतो. त्याचप्रमाणे चष्मेवाला, मुनिया, टोपीवाला, कोतवाल आदि लहान पक्ष्यांची या वृक्षावर वावर असतो. जंगलसंवर्धनासाठी साग हा अत्यंत उत्तम अशा प्रजातीचा वृक्ष आहे. एकूणच सागाचे लाकू ड ज्याप्रमाणे टिकाऊ आहे त्याप्रमाणे सागाचा वृक्ष पर्यावरण व जैवविविधतेचे संवर्धन करण्यामध्ये सिंहाचा वाटा आहे.भारतात जेव्हा इंग्रजांची सत्ता होती तेव्हा त्यांनाही भारतातील सागाच्या जंगलांनी आकर्षित केले होते. इंग्रजांकडून सागाच्या जंगलांची वर्गवारी करण्यात आली. त्यानुसार त्यांनी जंगलांमधून मोठ्या प्रमाणात साग इंग्लंडच्या दिशेने निर्यात केला; मात्र साग निर्यातीबरोबरच त्यांनी साज प्रजातीचे जंगल टिकविण्याबाबतही गांभिर्य दाखविले. ज्या जंगलातून सागाची वृक्षे तोडली त्याबरोबरच दुसऱ्या जागेत वृक्षांची लागवड देखील करण्यावर इंग्रजांनी भर दिला. त्यामुळे त्यांना सागापासून उत्पन्न मीळत राहिले. १५० वर्षांच्या सत्त्तेत इंग्रजांनी सागाचे संवर्धन व निर्यात अशा दोन्ही बाबींमध्ये संतुलन राखले. एकूणच सागाचे महत्व इंग्रजांच्याही लक्षात आले होते. सागाचा टिकाऊपणा बाबत इंग्रजही आश्चर्यचकित होते