परदेशी डॉक्टरांनी घेतले वासा थेरपी प्रशिक्षण
By admin | Published: January 22, 2017 11:08 PM2017-01-22T23:08:59+5:302017-01-22T23:09:47+5:30
वासा थेरपी : मेंदूविकारावरील देशातील पहिले स्वतंत्र केंद्र
सातपूर : आपल्याला एखादे चांगले शिक्षण अथवा प्रशिक्षण हवे असेल तर आपला कल परदेशाकडे असतो. परंतु परदेशातील डॉक्टर्स नाशिकला येऊन प्रशिक्षण घेऊन गेले तर कदाचित पटणार नाही. पण हे खरे आहे. परदेशी पाहुण्यांनी नाशिकमध्ये वासा उपचारपद्धती जाणून घेतली. सातपूर कॉलनीत मेंदूबाधित रुग्णांवर वासा थेरपीच्या माध्यमातून मोफत उपचार केले जातात. भारतातील पूर्णवेळ चालविले जाणारे हे एकमेव केंद्र आहे. या थेरपीचा अभ्यास करण्यासाठी परदेशातील डॉक्टरांचे पथक नाशिकमध्ये येऊन प्रशिक्षण घेऊन गेले आहेत. मेंदूबाधित रुग्णांवरील उपचारासाठी भारत आणि परदेशातून असंख्य रुग्ण येथील या केंद्रात येतात. फिनलँड आणि स्विडन या देशातील नऊ डॉक्टरांचे पथक नुकतेच येथे येऊन त्यांनी वासा थेरपीचा अभ्यास केला. या केंद्रात मेंदूबाधित रुग्णांवर कोणत्याही औषधांचा अथवा सर्जरीचा वापर केला जात नाही. जागतिक स्तरावर या उपचार पद्धतीला मान्यता मिळत आहे. डॉ. राजूल वासा या मूळच्या मुंबईच्या आहेत. डॉ. वासा फिजिओथेरपी तज्ज्ञ आहेत. त्यांनी स्वत:ची उपचार पद्धत शोधून काढली असून, या उपचार पद्धतीला ‘वासा थेरपी’ नाव दिले आहे. नाशिकचे उद्योजक उमेश राठी आणि डॉ. वासा यांची ओळख होती. नगरसेवक सलीम शेख यांच्या माध्यमातून राठी यांनी सातपूर कॉलनीत वासा सेंटरची स्थापना केली. पूर्ण वेळ उपचार करणारे हे पहिलेच केंद्र आहे. स्विडन आणि फिनलँड देशातील पाच रुग्णांनी दोन महिने उपचार घेतला आहे. गेल्या दीड वर्षाच्या काळात या केंद्रात आतापर्यंत ३५० रुग्णांनी उपचार घेतले आहेत.