वसाकाची सभा बेकायदेशीर : महेंद्र हिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:54 PM2018-08-31T23:54:24+5:302018-09-01T00:20:29+5:30
वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नाही मात्र ठराव करण्यासाठी ठरावीक ऊस उत्पादक सभासद बांधवांना विश्वासात घेऊन कार्यस्थळावर घेतलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील ३० हजार ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात घेऊन वसाका हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद व कळवण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केली आहे.
कळवण : वसाकाच्या खासगीकरणास आपला विरोध नाही मात्र ठराव करण्यासाठी ठरावीक ऊस उत्पादक सभासद बांधवांना विश्वासात घेऊन कार्यस्थळावर घेतलेली विशेष सभा बेकायदेशीर आहे. कार्यक्षेत्रातील ३० हजार ऊस उत्पादक सभासदांना विश्वासात घेऊन वसाका हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक सभासद व कळवण तालुका कॉँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र हिरे यांनी केली आहे. कळवण येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिरे यांनी सांगितले की, राज्य सरकारने किंवा राज्य शिखर बॅँकेने निविदा काढून खासगी तत्त्वावर वसाका चालविण्यास देताना क्षमता पाहून ऊस उत्पादक सभासद, कामगारांचे हित जोपासून योग्य न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा. खासगी तत्त्वावर होणारा करारनाम्यातील अटी व नियम यांची कल्पना सभासदांना दिली जावी. सभासद व ऊस उत्पादकांचा अंकुश ठेवण्यासाठी सनियंत्रण समिती ठेवावी, अशी मागणी हिरे यांनी केली. २८ आॅगस्ट रोजी झालेल्या विशेष सभेत ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. मर्जीतल्या मोजक्याच सभासदांची विशेष सभेत खासगी तत्त्वावर वसाका चालविण्यास देण्याबाबत ठराव केला त्यामुळे ठराव व विशेष सभा ही बेकायदेशीर ठरवून कार्यक्षेत्रातील सभासदांना निमंत्रित करून बैठक घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. वसाका खासगी तत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत काय अटी व शर्ती ठेवण्यात आल्या आहेत याची माहिती विशेष सर्वसाधारण सभा घेऊन ऊस उत्पादक सभासद बांधवांना द्यावी़ कार्यक्षेत्रातील सभासदांचे मत जाणून घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले.
प्राधिकृत मंडळाचे अध्यक्ष व संचालक मंडळाने कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासदांच्या भेटी घेऊन ऊस लागवड व गाळपासाठी वसाकाला ऊस देण्यासाठी बैठका घेतल्या. आता खासगी मालकाला वसाका देण्याचा घाट घातला जात असताना ऊस उत्पादक सभासदांच्या भेटी व बैठका घेऊन मत का विचारात घेतले नाही?
- महेंद्र हिरे, अध्यक्ष, कळवण तालुका कॉँग्रेस कमिटी