वसाका प्राधिकृत मंडळ बरखास्त करण्यात यावे
By admin | Published: December 21, 2016 11:27 PM2016-12-21T23:27:42+5:302016-12-21T23:28:04+5:30
सुनील देवरे : गळीत हंगाम सुरू ठेवण्यास असमर्थ
कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू ठेवण्यास असमर्थ ठरणाऱ्या प्राधिकृत मंडळाने स्वत: राजीनामा द्यावा अन्यथा शासनाने प्राधिकृत मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी वसाका बचाव कृती समितीचे निमंत्रक सुनील देवरे यांनी केली आहे. बुधवारी (दि.२१) वसाका बचाव कृती समितीच्या वतीने कळवण येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या लोकनियुक्त संचालक मंडळाने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व लूट करून पोबारा केला असल्याचा आरोप देवरे यांनी यावेळी केला. तसेच उर्वरित संचालकांनी अधिकार नसताना सलग तीन गळीत हंगाम वाया घालविले, सतत पाठपुरावा करून कारखाना बरखास्त केला, असेही त्यांनी सांगितले. शासनाने आपल्या पठडीतील प्राधिकृत मंडळ नियुक्त केले. यात जिल्हा बँक प्रतिनिधींचा भरणा असताना जिल्हा बँकेवर विसंबून राहिलेल्या प्राधिकृत मंडळाने अन्य प्रयत्न न करता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ करण्याचा कांगावा करून पद्धतशीर कारखाना बंद पाडला आहे. हा सभासदासह ऊस उत्पादक कामगार व संपूर्ण कार्यक्षेत्राचा विश्वासघात असल्याचा आरोप देवरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
वसाका कारखाना सुरू होणे काळाची गरज असून, कार्यक्षेत्राचे अर्थकारण यावर अवलंबून असतांना प्राधिकृत मंडळ स्वत:ची प्रतिष्ठा जपत कारखान्याची पत घालवीत आहे. केंद्र शासनपुरस्कृत साखर उद्योग वित्तीय सहाय्य योजनेतून कारखान्यास १०० कोटींचे बिगर व्याज कर्ज प्रस्ताव सादर करावा ही सतत मागणी असताना हा प्रस्ताव सादरच झाला नसल्याचेही देवरे यांनी निदर्शनास आणून दिले. धरणे आंदोलनात कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादाजी पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दीपक पगार, शिवसंग्रामचे प्रदेश सरचिटणीस उदयकुमार अहेर, शेकापचे दादाजी पाटील, कारखान्याचे माजी अध्यक्ष शांताराम तात्या अहेर, आ. कॉ. जे. पी. गावित यांना आग्रह धरणार असल्याचे देवरे व पगार यांनी यावेळी सांगितले. (वार्ताहर)