वसंत गिते, सुनील बागुल यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 01:53 AM2021-01-09T01:53:33+5:302021-01-09T01:54:16+5:30
माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले.
नाशिक : माजी आमदार व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते व सुनील बागुल यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसमवेत शुक्रवारी शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सायंकाळी मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधले. गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे अनेक पदाधिकारी व महापालिकेतील नगरसेवकांनी आपल्याशी संपर्क केला असून, लवकरच नाशिक शहराचे चित्र बदललेले दिसेल, असा गौप्यस्फोट राऊत यांनी यावेळी केला.
हॉटेल एक्स्प्रेस इन येथे सकाळी हा प्रवेश सोहळा झाला. खासदार राऊत यांनी पत्रकार परिषदेत वसंत गिते, सुनील बागुल, शोभा मगर व नामको बँकेचे संचालक प्रकाश दायमा यांच्या प्रवेशाची घोषणा केली. यावेळी बोलताना राऊत यांनी, गिते, बागुल यांच्या सेना प्रवेशाविषयी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे या दोघांच्या प्रवेशाने पक्षाला आणखी बळकटी येईल, त्यांच्यावर लवकरच नवीन जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.
गेल्या दोन दिवसांच्या आपल्या दौऱ्यात भाजपचे अनेक लोक भेटले, त्यात महापालिकेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. आता प्रवाह बदलत चालला असून, आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महापौर शिवसेनेचाच होईल, असा दावाही त्यांनी केला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते, विलास शिंदे, वसंत गिते, दत्ता गायकवाड, डी.जी. सूर्यवंशी, सत्यभामा गाडेकर, शरद देवरे आदी उपस्थित होते.